नाशिक,
Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या एका अत्यंत गुप्त मोहिमेत निदाला संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. निदा खान अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती, मात्र आता ती कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.
या अटकेनंतर निदा खानबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि वैयक्तिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर तिची वैद्यकीय चाचणी (UPT) करण्यात आली असून, त्यामध्ये निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी तिने गरोदरपणाचे कारण देत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. आता ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आल्याने पोलीस तपासादरम्यान तिची विशेष खबरदारी घेत आहेत.
हे प्रकरण केवळ निदाच्या अटकेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर याचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी एआयएमआयएमचे (AIMIM) नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी धाड टाकली आहे. पोलिसांच्या एका पथकाने जलील यांच्या घरी पोहोचून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी केली. निदा खानशी संबंधित काही महत्त्वाच्या दुव्यांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात आधीच चार आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या कारागृहात आहेत. निदा खान ही या संपूर्ण प्रकरणाची 'मास्टरमाईंड' असल्याचे मानले जात आहे. तिच्या अटकेमुळे आणि इम्तियाज जलील यांच्या घरी झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले आहे. पोलीस लवकरच निदा खानला न्यायालयात हजर करणार असून, त्यातून आणखी कोणते मोठे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.