रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! तिकीट रिफंड आणि आरक्षणाची सुविधा 'या' वेळेत बंद

    दिनांक :08-May-2026
Total Views |
मुंबई,
railway-news : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये (PRS) तांत्रिक देखभाल आणि 'पीएनआर फाईल कॉम्प्रेशन'चे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने तात्पुरता शटडाऊन जाहीर केला असून, ही प्रणाली ९ मे २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजल्यापासून ते १० मे २०२६ रोजी पहाटे १:१५ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. या दीड तासांच्या कालावधीत प्रवाशांना रेल्वेच्या अनेक सेवांचा लाभ घेता येणार नाही.
 
 
 
railway
 
 
या तांत्रिक कामामुळे प्रवासी आरक्षण, तत्काळ बुकिंग, कोचिंग रिफंड आणि आरक्षण चार्ट पाहणे यांसारख्या सेवा तात्पुरत्या थांबवण्यात येणार आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकांवरील टच स्क्रीन सेवा, आयव्हीआरएस (IVRS) प्रणाली आणि तिकीट रद्द करण्याचे काउंटरही या काळात कार्यरत नसतील. रेल्वे प्रशासनाने विशेषतः नमूद केले आहे की, इंटरनेटद्वारे होणारे ऑनलाइन तिकीट बुकिंगही या वेळेत उपलब्ध नसेल, त्यामुळे प्रवाशांनी आपले प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवणे सोयीचे ठरेल.
 
प्रवाशांच्या मनात रिफंडबाबत शंका असू शकते, मात्र रेल्वेने स्पष्ट केले आहे की या बंद कालावधीत कोणाचेही पैसे अडकणार नाहीत. प्रचलित नियमांनुसार टीडीआर (TDR) प्रणालीद्वारे रिफंडची प्रक्रिया सुरळीत सुरू राहील. रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि डेटाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी हे तांत्रिक काम करणे अनिवार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या काळात प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.