चिमूर,
chimur crime तालुक्यातील डोमा गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 37 वर्षीय निराधार आणि मतिमंद महिलेवर नराधमाने अत्याचार केल्याचे उघड झाले असून, या कृत्यामुळे पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पीडित महिला मतिमंद असून, तिला बोलता येत नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर ती गावात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत होती. तिला एक लहान भाऊ असून, तो कामासाठी बाहेरगावी राहतो. तिचा कोणताही आधार नसल्याचा फायदा घेत अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी गावातील आशा सेविका आणि इतर महिलांना पीडितेच्या शारीरिक अवस्थेत बदल जाणवला. संशय आल्याने त्यांनी तत्काळ तिला विश्वासात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.chimur crime वैद्यकीय अहवालात ती महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खळबळ माजली.
पीडितेच्या भावाने या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत असून, नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.