शहजाद भट्टी मॉड्यूलचा पर्दाफाश, नऊ संशयित ताब्यात

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Shahzad Bhatti module exposed दिल्लीमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या शहजाद भट्टी मॉड्यूलचा पर्दाफाश करत नऊ जणांना शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक गंभीर योजना उघड झाल्या असून राजधानीतील एका ऐतिहासिक मंदिराला लक्ष्य करण्याचा कट रचला गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत एक आरोपी मंदिर परिसराची पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा अंदाज घेत होता आणि पोलीस तसेच निमलष्करी दलांवर हल्ला करण्याचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्या मंदिराचे फोटो पाकिस्तानमधील समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या हस्तकांना पाठवण्यात आले होते, असेही चौकशीत समोर आले आहे.
 
 
 
Shahzad Bhatti module exposed
 
याशिवाय दिल्ली आणि सोनीपत महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या प्रसिद्ध ढाब्यावर स्फोटक हल्ला करण्याची योजना आखण्यात आल्याचेही स्पष्ट झाले असून हिसार येथील एका लष्करी तळाची टेहळणी करून त्याचे चित्रण देखील परदेशी हस्तकांपर्यंत पोहोचवण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील काही पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्याचा हेतू या गटाचा असल्याचे तपासात दिसून आले आहे. दरम्यान विविध राज्यांमध्ये राबविण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील संयुक्त कारवाईत अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर छापे टाकून शेकडो संशयितांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, काडतुसे, अमली पदार्थ, अवैध दारू, वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून देशातील सुरक्षा यंत्रणांना संभाव्य धोक्यांपासून रोखण्यासाठी विविध स्तरांवर तपास यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आल्या आहेत.