समाजमाध्यमांची अशीही सामाजिक बांधिलकी

    दिनांक :08-May-2026
Total Views |
अवघ्या 6 तासांत कन्यादानासाठी सरसावले मदतीचे हात

हदगाव, 
'social assistance' वडिलांचे छत्र हरवलेल्या एका कन्येच्या विवाहासाठी सामाजिक कार्यकर्तीने समाज माध्यमावर आवाहन करताच सामाजिक बांधिलकी जपत अनेक हात पुढे सरसावले. हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील वडिलांचे छत्र हरवलेली व अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगणारी तेजस्विनी बाबुराव पाईकराव हिचा विवाह तोंडावर आला होता. मात्र कन्यादानासाठी लागणाऱ्या  साहित्याच्या खरेदीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
 
 
kanyadan
 
'social assistance'  ही बाब सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा भारती यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. त्यांनी याची माहिती अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या बरडशेवाळा येथील ‘नाते माणुसकीचे’ व ‘आधार प्रतिष्ठान’ समूहांना दिली. या माहितीवर तत्काळ प्रतिसाद देत अध्यक्ष निवृत्ती वानखेडे, सचिव गजानन अनंतवार तसेच प्रभाकर दहिभाते यांनी मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अवघ्या सहा तासांत कन्यादानासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था पूर्ण झाली. विवाहाच्या पाच ते सहा दिवस आधीच सर्व कन्यादान साहित्य तेजस्विनीच्या घरी पोचवण्यात आले. यामुळे सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण पुन्हा एकदा समोर आले. या उपक्रमात अनेक दानशूरांनी विविध योगदान दिले.

लाभार्थी कुटुंबाचा आनंद
कन्यादानाचे साहित्य घरपोच मिळाल्यामुळे तेजस्विनी व तिच्या आईने समाधान आणि आनंद व्यक्त केला. यावेळी या सामाजिक कार्यातील अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित होत्या.