सूर्याचा 'पॉवर प्ले' संपणार? टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन!

    दिनांक :08-May-2026
Total Views |
नवी दिल्ली:
suryakumar-yadav : आयपीएलच्या रणधुमाळीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक खळबळजनक अपडेट दिली आहे, ज्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदावर आता टांगती तलवार असल्याचे समजते. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सूर्याने संघाचे नेतृत्व केले खरे, पण फलंदाज म्हणून तो सपशेल अपयशी ठरला. संपूर्ण स्पर्धेत केवळ अमेरिकेविरुद्धची एक खेळी वगळता, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. सूर्याच्या या खराब फॉर्ममुळे बीसीसीआयची थिंक-टँक सध्या प्रचंड नाराज आहे.
 

SURYA
 
 
 
 
सूर्याचा फॉर्म घसरण्यामागे त्याच्या उजव्या मनगटाची जुनी दुखापत हे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो मनगटावर टेप बांधून खेळताना दिसत आहे. विश्वचषकाच्या नेट प्रॅक्टिस दरम्यानही डॉक्टरांना त्याच्या मनगटावर विशेष पॅडिंग करावी लागत होती. सुरुवातीला संघ व्यवस्थापनाने याला सामान्य थकवा मानले होते, परंतु आता ही दुखापत त्याच्या फलंदाजीसाठी अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ पासून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सूर्याला फलंदाजीत आपली जुनी लय सापडलेली नाही.
 
 
बीसीसीआय आता २०२८ चे ऑलिम्पिक आणि पुढील टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून एका तंदुरुस्त आणि तरुण नेतृत्वाच्या शोधात आहे. सूर्याचे वाढते वय आणि फिटनेसच्या समस्या पाहता, त्याच्याकडून नेतृत्व काढून घेण्याचे संकेत मिळत आहेत. या शर्यतीत सध्या श्रेयस अय्यरचे नाव सर्वात आघाडीवर आहे. श्रेयस अय्यरला केवळ संघात पुनरागमन करण्याची संधी मिळणार नाही, तर त्याच्याकडे थेट भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. या मोठ्या बदलामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटच्या रचनेत मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.