सिरमौर,
death of two children हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. दोन लहान भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना नौहराधर तहसीलमधील देवमनाल गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांचा अयान आणि नऊ वर्षांचा अभिनव हे दोघे भाऊ गावाजवळील दरीजवळ खेळत होते. यावेळी अरुंद मार्ग ओलांडताना अयानचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात पडला. आपल्या धाकट्या भावाला बुडताना पाहून अभिनवने क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही आणि दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि गावकरी तातडीने घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मुलांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. death of two children दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. प्रशासनाकडूनही पीडित कुटुंबाला मदत करण्यात येत आहे. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, ओढे आणि दरी परिसरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी अशा ठिकाणी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.