नवी दिल्ली,
Trump's warning to Iran होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा करत सांगितले की, अमेरिकेच्या तीन अत्याधुनिक युद्धनौका गोळीबाराच्या परिस्थितीतून सुरक्षितपणे पुढे गेल्या असून इराणकडून करण्यात आलेल्या कारवाईला अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या संघर्षात इराणच्या अनेक लहान नौका आणि मानवरहित विमाने नष्ट करण्यात आली. ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या निवेदनात म्हटले की, अमेरिकेच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता, मात्र संरक्षण यंत्रणांनी ती सहजपणे हवेतच नष्ट केली. याशिवाय अमेरिकेकडे येणारी मानवरहित विमाने देखील हवेतच पाडण्यात आली. या कारवाईत अमेरिकेच्या कोणत्याही युद्धनौकेचे नुकसान झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अमेरिकेच्या मते, इराणने वापरलेल्या काही नौकांचा उपयोग त्यांच्या नौदल क्षमतेसाठी केला जात होता आणि त्या कारवाईदरम्यान पूर्णपणे समुद्रात बुडाल्या. ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावरही कठोर टीका करत ते अत्यंत आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे म्हटले. तसेच इराणने करारावर स्वाक्षरी न केल्यास भविष्यात आणखी कठोर लष्करी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेच्या नौदलाने होर्मुझ परिसरातील नाकेबंदी अधिक मजबूत केल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, या भागात तैनात युद्धनौका पुन्हा सुरक्षा मोहिमेत सहभागी होणार असून अमेरिकेची लष्करी तयारी पूर्णपणे सज्ज आहे. दुसरीकडे, इराणसोबत सुरू असलेल्या चर्चांबाबत बोलताना ट्रम्प यांनी चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचा दावा केला, मात्र परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचे स्पष्ट संकेत या घडामोडींमधून मिळत आहेत.