अंकारा,
Turkey tests missile मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानने आपल्या पहिल्या आंतरखंडीय प्रकारच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या विकासाची घोषणा केली आहे. या नव्या क्षेपणास्त्राला “यिल्दिरिम्हान” असे नाव देण्यात आले असल्याचे सांगितले जात असून, त्याच्या क्षमतेबाबत अनेक दावे समोर आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राची अंदाजे मारक क्षमता सहा हजार किलोमीटर इतकी असल्याचे म्हटले जाते. या अंतरामुळे अंकारापासून नवी दिल्लीपर्यंतचे सुमारे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर लक्षात घेता, तांत्रिकदृष्ट्या भारतातील काही भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकतात, असे विश्लेषण तज्ज्ञांकडून केले जात आहे.
विशेष म्हणजे यामध्ये सुमारे तीन हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याचेही सांगितले जाते. या क्षमतेमुळे पारंपरिक स्फोटकांपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या लढाऊ सामग्रीपर्यंत वापर शक्य असल्याचे म्हटले जाते.तांत्रिक माहितीनुसार या प्रणालीमध्ये अनेक रॉकेट इंजिन आणि द्रव इंधनाचा वापर केला जातो. हे क्षेपणास्त्र तुर्कस्तानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून विकसित करण्यात आले असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले असून, प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने याचे परिणाम काय होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वसाधारण नियमांनुसार पाच हजार पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांना आंतरखंडीय श्रेणीत गणले जाते. या पार्श्वभूमीवर हे नवे क्षेपणास्त्र त्या श्रेणीत बसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका खंडातून दुसऱ्या खंडातील लक्ष्यावर प्रहार करण्याची क्षमता त्यात असल्याचा दावा केला जातो.अहवालांनुसार हे क्षेपणास्त्र अत्यंत प्रचंड वेगाने, म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या पंचवीस पट वेगाने उडू शकते, असेही नमूद केले जाते. इतक्या वेगामुळे संरक्षण यंत्रणांना ते रोखणे अत्यंत कठीण ठरू शकते, तसेच प्रत्युत्तरासाठी अत्यल्प वेळ उपलब्ध होतो.