नालीतील कचरा व घाण फेकली नगरपरिषदेत

    दिनांक :08-May-2026
Total Views |
सत्तारूढ गटाच्या नगरसेवकाचे अजब आंदोलन

वरोडा, 
Varoda Municipal Council नगर परिषद प्रशासनाला वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रभागातील नाल्यांची सफाई न झाल्याने सत्तारूढ गटाचे नगरसेवक राजू खंडारे यांनी शुक्रवार, 8 मे रोजी नाल्यातील कचरा व घाण नगर परिषदेत आणून टाकली. या आंदोलनाने नगर परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
 
 
varoda
 
Varoda Municipal Council वरोडा नगरपरिषदेत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सत्तारूढ झाला. शहरातील नाल्या साफ होत नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. कचर्‍याचे ढीग साचलेले असल्याने डास व इतर कीटकांची निर्मिती होऊन आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक सातचे सत्तारूढ पक्ष गटाचे नगरसेवक राजू खंडारे यांनी आंदोलन केले. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह कचरा व घाण नगर परिषदेत आणून टाकली. नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जनतेच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर आपणास लोकशाही मार्गाने अशा प्रकारे आंदोलन करून, लोक जागृती करावी लागेल, असा इशारा खंडारे यांनी दिला.
मुख्याधिकार्‍यांनी केली पोलिसात तक्रार
सदर घटनेची नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी गंभीर दखल घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पोलिस प्रशासन या घटनेचा तपास करीत आहे.