चेन्नई,
Vijay needs majority तामिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होत असून, अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांकडून समजते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि विदुथलाई चिरुथैगल कच्ची या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात एकूण २३४ विधानसभा जागा असून, यंदाच्या निकालांमध्ये विजय यांच्या पक्षाने १०८ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना दोन जागांवर तांत्रिक अडचणींमुळे बदल करावा लागल्याने त्यांच्या जागांची संख्या १०७ झाली आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११८ च्या बहुमतापासून ते काहीसे दूर आहेत.

या परिस्थितीत इतर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा निर्णायक ठरत असून, काँग्रेसच्या काही आमदारांसह इतर सहा आमदारांनीही समर्थन दर्शवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आवश्यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळण्याची शक्यता वाढली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, कम्युनिस्ट पक्ष आणि विदुथलाई चिरुथैगल कच्ची यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. या तिन्ही पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अद्याप या पक्षांच्या अंतर्गत बैठका सुरू असून, अंतिम निर्णयानंतर अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या एका बैठकीनंतर पाठिंब्याचे पत्र संबंधित प्रतिनिधीकडे सुपूर्त करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. या घडामोडींमुळे तामिळनाडूच्या राजकारणात नव्या आघाडीची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.