अर्जुनी मोरगाव
gondia-news तालुक्यातील उमेद अभियानाशी संलग्न २३ महिला कॅडर यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शिक्षणाची नवी वाट निर्माण करत दहावीचे अपूर्ण राहिलेले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. घरची जबाबदारी, नोकरी, कुटुंबाची काळजी आणि दैनंदिन कामांचा ताण सांभाळत त्यांनी मिळवलेले हे यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
gondia-news उमेद अभियान आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या सेकंड चान्स प्रोग्राममुळे या महिलांना पुन्हा एकदा शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदार्या आणि सामाजिक परिस्थितीमुळे अनेक महिलांचे शिक्षण मध्येच थांबले होते. मात्र, मनामध्ये शिक्षण पूर्ण करण्याची तीव्र इच्छा कायम होती. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची गरज असताना उमेद अभियाच्या तालुका व्यवस्थापक रिता आर. दडमल यांनी पुढाकार घेत या महिलांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे महिलांचे मनोबल उंचावले आणि त्यांनी पुन्हा पुस्तक हाती घेतले. या महिलांनी दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत नियमित ऑनलाईन वर्गांना उपस्थिती लावली. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा ऑफलाईन वर्गात सहभागी होत त्यांनी अभ्यासात सातत्य राखले. दिवसभर कष्टाची कामे करून रात्री अभ्यासासाठी वेळ काढणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. तरीदेखील परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी शिक्षणाची ज्योत कायम प्रज्वलित ठेवली.
gondia-news कुटुंबीयांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर या महिलांनी दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. या यशामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली असून भविष्यात आणखी शिक्षण घेऊन स्वतःच्या प्रगतीसह समाजातही सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आहे. हा उपक्रम केवळ शैक्षणिक यशापुरता मर्यादित नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. शिकण्याला वयाची मर्यादा नसते हा संदेश या महिलांनी आपल्या कर्तृत्वातून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला आहे. शिक्षणाची खरी ओढ आणि जिद्द असेल, तर कोणतीही अडचण प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.