भंडाऱ्यात मध्यरात्री तरुणाची हत्या!

-सीसीटीव्हीत कैद झाला मृत्यूचा थरार -8 संशयीत ताब्यात

    दिनांक :09-May-2026
Total Views |
भंडारा,
murdered in bhandara भंडाऱ्यातील जलाराम चौक परिसरात मध्यरात्री झालेल्या हल्ल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून काही हल्लेखोरांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कार्तिक भंडारीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आठ संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
 
murdered in bhandara
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक भंडारी हा मध्यरात्रीच्या सुमारास जलाराम चौक परिसरात असताना काही जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात असून, या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भररस्त्यात घडलेल्या या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणातील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग तपासला जात आहे.
विशेष म्हणजे जलाराम चौक हा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे.murdered in bhandara पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर असलेल्या भर चौकात खुनाची घटना होणे हे गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.