दोन मित्रांचा आयपीएल सामना ठरला अखेरचा!

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Accident involving friends watching IPL आयपीएलचा सामना पाहून घरी परतणाऱ्या दोन मित्रांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. ईशान्य दिल्लीतील खजुरी खास उड्डाणपुलाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, हेमंत तिवारी आणि रोहित उर्फ सोनू हे दोघे दुचाकीवरून घरी जात होते. उड्डाणपुलावरून खाली उतरत असताना भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनाला पाठवले. या प्रकरणात कारचालक हिमांशू याला अटक करण्यात आली आहे.
 

Accident involving friends watching IPL 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची आणखी एक हृदयद्रावक घटना दिल्लीत घडली होती. आयपीएलचा सामना पाहून परतणाऱ्या दोन चुलत भावांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. अशोक रोड परिसरात झालेल्या त्या अपघातात यज्ञ भाटिया आणि त्याचा धाकटा भाऊ अभव यांचा जीव गेला होता. अपघाताच्या काही क्षणांपूर्वी अभवने आपल्या वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधून अर्ध्या तासात घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर घडलेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या प्रकरणात धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते. तपासादरम्यान परिसरातील चित्रफितींची पाहणी करण्यात आली आणि अखेर आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्यात यश आले. त्याला बिहारमधून अटक करण्यात आली. या सलग घटनांमुळे बेदरकार वाहनचालकांविरोधात पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.