नवी दिल्ली,
Air India's big decision विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून सध्या कोणतीही कर्मचारी कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ व्यवस्थापनाने दिले आहेत. वाढत्या इंधनदरांमुळे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आर्थिक दबाव वाढला असला, तरी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ देणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अंतर्गत बैठकीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत वाढत्या विमान इंधनदरांमुळे कंपनीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचे आणि ऐच्छिक खर्च कमी करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कंपनीने वार्षिक वेतनवाढ तात्पुरती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ किमान एका तिमाहीनंतर लागू होण्याची शक्यता आहे. मात्र पदोन्नतीची प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू राहील, असे मानव संसाधन विभागाकडून सांगण्यात आले. तसेच कंपनीच्या प्रोत्साहनाधारित वेतनपद्धतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.एअर इंडियामध्ये सध्या सुमारे २४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीसमोर सध्या अनेक आर्थिक आव्हाने उभी आहेत. पाकिस्तानची हवाई सीमा बंद असल्यामुळे उड्डाणांचे मार्ग लांबले आहेत, तर रुपयाच्या घसरणीमुळेही खर्च वाढला आहे. याशिवाय विमान इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यामुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.विमान इंधनाचा खर्च हा कोणत्याही विमान कंपनीच्या एकूण खर्चातील मोठा भाग मानला जातो. त्यामुळे इंधनदर वाढल्यास त्याचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थितीवर होतो. या पार्श्वभूमीवर खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी एअर इंडियाने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.