आयपीएलच्या मैदानात आता कॅपसाठी युद्ध

    दिनांक :09-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
battle for the cap in the IPL आयपीएल २०२६ मध्ये जेवढी उत्सुकता बाद फेरीच्या लढतींबाबत आहे, तेवढीच रंगत सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज ठरण्यासाठीच्या स्पर्धेतही पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानंतर धावांचा आणि बळींचा आकडा बदलत असल्याने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची शर्यत अधिकच चुरशीची बनली आहे. आगामी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना या दोन्ही मानाच्या पुरस्कारांचे चित्र बदलू शकतो.फलंदाजांच्या शर्यतीत हेन्रिक क्लासेन सध्या अव्वल स्थानी असून त्याने ४९४ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा ४७५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केएल राहुलने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात २३ धावांची खेळी करत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याच्या खात्यात आता ४६८ धावा जमा झाल्या आहेत.
 

 cap in the IPL 
 
याचवेळी राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या वैभवने आतापर्यंत ४०४ धावा केल्या असून तो अव्वल फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गुजरातचा साई सुदर्शन आणि शुभमन गिल हेही जोरदार कामगिरी करत असल्याने आगामी सामना फलंदाजांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या हंगामात आधीच सहा फलंदाजांनी ४०० पेक्षा अधिक धावा केल्याने स्पर्धेची तीव्रता स्पष्ट होत आहे.
 
गोलंदाजांमध्येही तितकीच रोमांचक लढत सुरू आहे. भुवनेश्वर कुमार आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी १७ बळी घेत अव्वल स्थान पटकावले आहे. कमी धावा दिल्यामुळे भुवनेश्वर सध्या आघाडीवर मानला जात आहे. त्यांच्यामागे प्रिन्स यादव आणि कागिसो रबाडा प्रत्येकी १६ बळींसह जोरदार स्पर्धेत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा विशेष चर्चेत आहे. गेल्या काही सामन्यांत त्याने सातत्याने प्रभावी गोलंदाजी करत बळी मिळवले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो अव्वल स्थानी झेप घेऊ शकतो. मात्र त्याच्यासमोर जोफ्रा आर्चरचे आव्हानही तितकेच मजबूत आहे. आर्चरच्या नावावर सध्या १५ बळी असून तोही सर्वोच्च स्थानासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यामुळे आयपीएल २०२६ मध्ये केवळ संघांमधील लढतीच नाहीत, तर सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज होण्यासाठीची स्पर्धाही क्रिकेटप्रेमींसाठी मोठे आकर्षण ठरत आहे.