चार दिवसांत 4 गुन्हे दाखल : 17 जनावरे व 9 वाहने जप्त
वणी,
Cattle transport case वणी परिसरात गोवंश जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये एकूण 17 गोवंश व 9 वाहने जप्त करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरोधात प्राणी संरक्षण तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पहिली कारवाई 28 एप्रिल रोजी मोहर्ली गावाजवळ करण्यात आली. दिनेश सालवटकर यांच्या तक्रारीवरून तीन पिकअप वाहनांमधून सात गोवंश जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तीन वाहने व सात जनावरे असा सुमारे 6 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी युवराज तुराणकर, सुनील आसुटकर व अभय उईके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई 3 मे रोजी वणी रोड रेल्वे क्रॉसिंग परिसरात करण्यात आली. सुमित निलावार यांच्या तक्रारीनुसार टाटा इन्ट्रा वाहनातून एक बैल व दोन गोवंश जनावरांना आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याविना वाहतूक केली जात होती. पोलिसांनी हा सुमारे 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिब्रान शेख अकिल व पुणाजी मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Cattle transport case तिसऱ्या प्रकरणात 5 मे रोजी पहाटे ड्रीमलॅन्ड सिटी, मुर्धानी रोड परिसरात दोन बैलांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धनराज मडावींच्या तक्रारीवरून राजू गुप्ता, अनिल खैरे व शेख रिजवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत दोन बैल व एक वाहन असा 1.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौथी मोठी कारवाई 5 मे रोजी सकाळी संविधान चौक येथे करण्यात आली. विशाल दुधबळे यांच्या तक्रारीवरून चार वेगवेगळ्या वाहनांतून आठ गोवंश निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी चार वाहने व आठ जनावरे असा सुमारे 6 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी प्रथमेश बोरतवार, रामदास रागीट, शंकर झाडे, शरद चटकी, नंदकिशोर डोळस, लक्ष्मण घागी, गणेश दातारकर व अमीत कसारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व प्रकरणांत आरोपी जनावरांना आखूड दोरीने बांधून वाहनात कोंबत असल्याचे निष्पन्न झाले. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती तसेच वाहतूक व जनावरांची आवश्यक कागदपत्रेही आरोपींकडे आढळून आली नाहीत. पुढील तपास वणी पोलिस करत आहेत.