रापेवाडा परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी

    दिनांक :09-May-2026
Total Views |
गोंदिया
Gondiya news मागील दोन दिवसांपासून गोंदिया, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेक घरांची छप्परे उडाली असून शेतातील धानपिकांसह आंबा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
gondiya photo 
Gondiya news विशेषतः रापेवाडा परिसरात ८ मे रोजी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी तात्काळ रापेवाडा येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी तसेच संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना घटनेची माहिती देत नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी नुकसानीचा पंचनामा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
Gondiya news चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. तसेच शेतकर्‍यांचे धान, आंबा आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, रापेवाडा परिसरातील नुकसानीचा पंचनामा सुरू करण्यात येणार असून, केवळ औपचारिकता न करता नुकसानग्रस्तांना ठोस आणि तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या या आपत्तीमुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.