नगर परिषद झोपेत : नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू
उमरखेड,
danger of stray dogs शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील विविध भागांत आजारी व आक्रमक अवस्थेतील भटके कुत्रे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. काही कुत्र्यांच्या अंगावरील केस पूर्णपणे गळणे, त्वचा सोलणे व जखमा होणे अशी लक्षणे दिसून येत असून हा त्वचारोग किंवा संसर्गजन्य आजार असल्याची भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.
तज्ञांच्या मते अशा कुत्र्यांना खाज रोग (मॅन्ज/स्केबीज प्रकार) किंवा इतर संसर्गजन्य त्वचारोग असण्याची शक्यता असते. या आजारामुळे कुत्र्यांच्या अंगावरील केस गळणे, त्वचा सडणे, जखमा होणे व तीव्र खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अशा कुत्र्यांच्या संपर्कात आल्यास लहान मुले, महिला व नागरिकांना त्वचारोग, संसर्ग, अॅलर्जी तसेच चावा घेतल्यास रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. काही दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक शाळकरी मुले, महिला, पुरुष तसेच वयोवृद्धांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही उमरखेड नगर परिषदेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.
danger of stray dogs विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात अनेक वेळा श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध राहात नसल्याने नागरिकांना उपचारासाठी नांदेड येथे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक हाल होत आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांची नसबंदी करणे व लसीकरण करण्यासाठी अद्याप प्रभावी ठेकेदार यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र आहे. अनेक वेळा वृत्तपत्रांमधून बातम्या प्रकाशित झाल्या, निवेदने देण्यात आली. मात्र नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांची धरपकड, नसबंदी, लसीकरण मोहीम राबविणे तसेच श्वानदंशावरील इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.