‘दीनदयाल’ने जागवली ‘ती’ची शिकायची जिद्द

    दिनांक :09-May-2026
Total Views |
तब्बल 30 वर्षांच्या शिक्षणखंडानंतर लता झाली दहावी..!

यवतमाळ, 
Deendayal Sanstha Project  स्थगिती आणि गळती हे शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचे अडथळे मानले जातात. मधूनच शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणणे अतिशय जिकरीचे असते. विद्यार्थ्यांमध्ये, विशेषत: मुलींमध्ये हे प्रमाण सर्वाधिक पहायला मिळते. परंतु अशा शिक्षणात खंड पडलेल्यांना पुन्हा परीक्षा द्यायची इच्छा झाली की घडतो, तो असतो इतिहास..! असेच उदाहरण प्रस्तुत केले आहे, लता विनोद कोठाडे अर्थात् पूर्वाश्रमीच्या लता शंकर डोईजड हिने. ही कथा आहे, गळव्ह्याच्या जिद्दी लताची. 1996-97 साली नवव्या वर्गानंतर लताची शाळा सुटली. त्यावेळी वडिलांच्या परिस्थितीने तिला शिक्षण सोडायला भाग पाडले. पुढे तिचे विनोद कोठाडे या अल्पभूधारक शेतकèयाशी लग्न झाले नि चूल आणि मूल अशा चाकोरीबद्ध संसारात लता रममाण झाली.
 
 
lata
 
दरम्यान, यवतमाळातील पारधी व शेतकरी विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानशी तिचा संबंध आला. संस्थेच्या किचन गार्डन प्रकल्पांतर्गत परसबाग फुलवणाऱ्या महिलांची सॉक्स मॅनेजर म्हणून लताची नेमणूक झाली. परिसरातील 200 महिलांना दीनदयालमार्फत विषमुक्त, सेंद्रिय भाजी पिकवण्यासाठी बियाणे देणे, मार्गदर्शन करणे आणि सतत संपर्कात राहून आढावा घेणे असे लता करू लागली. लतासारख्या इतरही 45 जणी संस्थेत सॉक्स मॅनेजर म्हणून काम करतात. या सर्वांचं नियमित एकत्रित येणं, परस्पर ओळख होणं आणि आपली सुखदु:ख शेअर करणं सुरू झालं.
 
Deendayal Sanstha Project दीनदयाल संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये प्रकल्पाचे सादरीकरण करताना आधी आपला परिचय द्यावा लागतो. संस्थेतील मंडळीसुद्धा सॉक्स मॅनेजर किती शिकले आहेत, त्यांच्या घरची आर्थिक, सामाजिक स्थिती कशी आहे याबाबतही विचारपूस करतात. परिचयाच्या वेळी मात्र लताला आपण केवळ नववा वर्ग पास आहोत हे सांगताना संकोच व्हायचा. इतर सॉक्स मॅनेजर पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि आपल्या हाती बोर्डाचे प्रमाणपत्रसुद्धा नाही, ही बाब तिची तिलाच खटकू लागली. हातातील पेन केव्हाच सुटला होता, काय करावे कळत नव्हते.
 
 
Deendayal Sanstha Project  दीनदयाल हा असा परिवार आहे की जिथे आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवता येते हे मात्र तिने जाणले. नववीनंतर थांबलेलं शिक्षण पुढे सुरू करायचं हा मनोदय तिनं संस्थेत बोलून दाखवला. संस्थेतील महिला व इतरांशी चर्चा करून सुरू झाले, पुनश्च हरिॐ ! दहावीचा खाजगी फॉर्म कसा भरावा, पुस्तकं, प्रात्यक्षिकं, अभ्यास कसा करावा वगैरे शोधाशोध सुरू झाली. आवश्यक मार्गदर्शन मिळाले. सॉक्स मॅनेजरच्या कामातूनही तिला आवश्यकतेनुसार अभ्यासाकरता, विशेषतः परीक्षेकरता सुट्टी मिळू लागली. परिणाम..? तब्बल 30 वर्षानंतर लता दहावीच्या परीक्षेला बसली आणि थोडेथोडके नव्हे तर 57.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण देखील झाली. म्हणतात ना, ‘आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे !’ जिद्द असेल तर अशक्य ते शक्य घडू शकते. अर्थात् आपल्या या दहावी पास होण्यात दीनदयाल संस्थेतील वातावरणाचा, अहवाल लिहिताना हाती पेन धरण्याचा मोठा वाटा आहे हे सांगण्यास लता विसरत नाही. लताने दहावीत उत्तीर्ण होऊन केवळ स्वतःची शिक्षणगंगा प्रवाहित केली असे नाही तर या निमित्ताने तिच्यासारख्या मध्येच शिक्षण थांबलेल्यांना पुन्हा या प्रवाहात येण्यासाठीची प्रेरक पटकथासुद्धा लिहिली आहे.