communism आज भारताच्या राजकीय पटलावर एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. एकेकाळी देशाच्या काही भागांवर आपली पकड मजबूत ठेवणारे कम्युनिस्ट आज एकाही राज्याच्या सत्तेवर नाहीत. केरळमध्ये शेवटची कम्युनिस्ट सत्ताही इतिहासजमा झाली आहे. तिथे भारतीय मूल्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा विजय झाला असला, तरी भारतीय मूल्ये व लोकशाही न मानणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला, ही विशेष आनंदाची बाब आहे. अशा वेळी कम्युनिस्टांनी पेरलेल्या हिंसेची, दगाबाजीची आणि लोकशाहीविरोधी कारवायांची पृष्ठभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कम्युनिझम हा एक असा विचार आहे, ज्याने जगभरात क्रांतीच्या नावाखाली कोट्यवधी लोकांचे बळी घेतले. कार्ल मार्क्सने मांडलेला हा सिद्धांत सुरुवातीला शोषितांच्या मुक्तीचा मुखवटा घालून आला; प्रत्यक्षात या विचाराने हुकूमशाही, दमन आणि मानवी हक्कांचे हनन केले.
भारतात कम्युनिझमचा प्रवेश स्वातंत्र्यापूर्वी झाला. सुरुवातीला ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी झाल्याचे भासवण्यात आले किंवा खरोखरच इथल्या तरुणांनी कम्युनिझमचा वापर इंग्रजांच्या विरुद्ध केला. कारण हा नवा विचार होता आणि तरुणांना नवा विचार, त्यात एखादा विचार रोमँटिक (प्रेमळ नव्हे) असेल तो विचार आकर्षित करतो. पण या कम्युनिस्टांच्या आकांचे खरे उद्दिष्ट नेहमीच भारताच्या मूळ संस्कृती आणि राष्ट्रीयत्वाला सुरुंग लावण्याचे राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला, पण त्यांचे अंतर्गत धोरण नेहमीच विध्वंसक राहिले आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये त्यांनी सत्ता मिळविली; तिथेही त्यांनी आपल्या विचारधारेनुसार विरोधकांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न केला. राजकीय हत्या, दंगली आणि विकासाला खीळ घालणारे धोरण हे त्यांच्या राजकारणाचे अविभाज्य भाग बनले.
कम्युनिस्ट विचारधारेचे सर्वात क्रूर आणि हिंसक रूप म्हणजे नक्षलवाद. माओवादीविचारसरणीतून जन्माला आलेला हा नक्षलवाद भारताच्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांमध्ये पसरला. शोषितांना न्याय देण्याच्या नावाखाली त्यांनी आदिवासींना आणि सामान्य लोकांना आपल्या हिंसक कारवायांमध्ये ओढले. त्यांच्या हाती शस्त्रे दिली, त्यांच्या मनात सरकारविरोधात द्वेष पेरला आणि त्यांना लोकशाही व्यवस्थेपासून दूर केले. नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप लोकांची हत्या केली, सरकारी मालमत्तेची नासधूस केली, विकासाच्या योजनांना खीळ घातली आणि त्या त्या भागांना विकासापासून वंचित ठेवले. त्यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, त्यांच्या मुला-मुलींना जबरदस्तीने आपल्या संघटनेत सामील केले आणि त्यांना मानवतेच्या अधिकारांपासून वंचित ठेवले. जंगली नक्षलवादाने भारताच्या लोकशाहीचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने कठोर पावले उचलून या हिंसक चळवळीचा चांगलाच निकाल लावला आहे. आज नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, पण त्याचे अवशेष अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. जंगली नक्षलवादाचा बीमोड होत असतानाच कम्युनिस्टांनी आपले डावपेच बदलले आहेत. आता ते शहरी नक्षलवाद आणि सांस्कृतिक मार्क्सवादाच्या माध्यमातून लोकशाहीला पोखरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरी नक्षलवाद म्हणजे थेट शस्त्रे न वापरता, बौद्धिक आणि सामाजिक स्तरावर देशाच्या मूळ विचारधारेला, संस्कृतीला आणि संस्थांना कमजोर करणे. हे लोक विद्यापीठांमध्ये, माध्यमांमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये आणि कला क्षेत्रात घुसून आपली विषारी विचारधारा पसरवत आहेत. ते देशाच्या इतिहासाला विकृत करतात, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करतात तसेच समाजाला विविध गटांमध्ये विभागून त्यांच्यात संघर्ष निर्माण करतात. सध्या प्रांतवाद हे त्यांचे शस्त्र बनले आहे. महाराष्ट्रातही प्रांतवादाच्या नावाने कम्युनिज्म पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यांचे चेहरे गोड गोंडस, सुशिक्षित वाटत असले तरी त्यांचा मूळ उद्देश भारताला आतून कमजोर करून अराजकता निर्माण करणे हाच आहे.
या शहरी नक्षलवादाचेच एक रूप म्हणजे ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ आणि ‘वोकवाद.’ हे दोन्ही विचार समाजाच्या पारंपरिक मूल्यांवर, कुटुंब संस्थेवर, धर्मावर आणि राष्ट्रावर हल्ला करतात. ते लैंगिक समानता, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यांसारख्या उदात्त संकल्पनांचा वापर करून समाजाला विभाजित करतात. 2021 मध्ये अमेरिकेत झालेल्या ‘जागतिक हिंदुत्वाचे विघटन’ आणि 2024 मध्ये बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात झालेल्या ‘हिंदुत्वाचा नायनाट’ यांसारख्या परिषदा याच सांस्कृतिक मार्क्सवादाची उदाहरणे आहेत. या परिषदांमधून एका विशिष्ट धर्माला आणि संस्कृतीला लक्ष्य करून समाजात द्वेष आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. हे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या मूळ संस्कृतीला आणि अस्मितेला हिणवतात, पण जेव्हा त्यांच्या विचारधारेवर प्रश्न विचारला जातो, तेव्हा ते लगेच ‘असहिष्णुता’ आणि ‘दडपशाही’चा बुरखा पांघरतात. हे लोक इतिहासाचं विकृतीकरणही उत्तमरीत्या करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत 57 टक्के मुसलमान होते. ते बेंबीच्या देठापासून सांगतात, ज्या काळी युरोपलाही सेक्युलरिज्म माहीत नव्हता त्या काळी महाराज सेक्युलर होते, असा खोटा प्रचार करतात. इतिहासाला विकृत करण्याची यांच्या दोन पद्धती आहेत. समर्थ रामदासांना हे शिव्या घालतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलतात. म्हणजे महापुरुषांना बदनाम करून आणि त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवून अशा दोन्ही प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करतात.
वोकवाद हा सांस्कृतिक मार्क्सवादाचाच एक पुढचा टप्पा आहे, जो अत्यंत धोकादायक आणि विकृत स्वरूपात समोर येत आहे. यात ‘मी जे काही आहे, तेच सत्य’ अशी एक विचित्र विचारसरणी रुजवली जात आहे. याचा एक धक्कादायक प्रकार इंग्लंडमध्ये पाहायला मिळाला. बलात्काराच्या एका आरोपीला वाटले की तो महिला आहे, म्हणून त्याला महिलांच्या कोठडीत ठेवण्यात आले. ही विकृतीची पराकाष्ठा आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटले की तो कुत्रा आहे तर त्याला कुत्रा मानायचे का? ही विचारसरणी मानवी अस्तित्वाच्या मूलभूत संकल्पनांनाच आव्हान देत आहे. यामुळे समाजातील नैसर्गिक व्यवस्था कोलमडून पडू शकते, स्त्री-पुरुष यांच्यातील नैसर्गिक समतोल नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा परिणाम म्हणून महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि सामाजिक अराजकता वाढत आहे. कम्युनिस्टांनी लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता गमावली असली, तरी शहरी नक्षलवाद आणि सांस्कृतिक मार्क्सवादाच्या माध्यमातून त्यांचा धोका अजूनही कायम आहे. ही कम्युनिस्ट शक्ती वेगवेगळ्या माध्यमांतून समाजात भ्रम निर्माण करीत आहे. तरुणांची माथी भडकवत आहे आणि देशाच्या एकात्मतेला आव्हान देत आहे. या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.
आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला या विचारधारेच्या धोक्यांबद्दल शिक्षित करणे, आपल्या संस्कृती आणि मूल्यांचे रक्षण करणे आणि लोकशाही संस्थांना मजबूत करणे हे आपले कर्तव्य आहे. कम्युनिस्टमुक्त लोकशाही झाली असली, तरी आव्हान अजूनही मोठे आहे. राज्यकर्त्यांनी आता थोडे कठोर होऊन राजधर्माचे पालन केले पाहिजे तसेच हिंदूंनी खèया अर्थाने जागं झालं पाहिजे. पुढची 50 वर्षे हिंदूंनी एकमेकांसोबत भांडण, मारामाऱ्या करणे सोडून दिले पाहिजे.communism जसं मंदिरात जाताना आपण चपला बाहेर सोडतो, त्याचप्रकारे घराच्या बाहेर पडताना आपली जात आणि प्रांत घरीच सोडून हिंदू म्हणून बाहेर पडावं लागणार आहे. शिवाजी आमचे, सावरकर तुमचे, समर्थ आमचे, तुकाराम तुमचे - असला वाह्यातपणा सर्वात आधी हिंदूंनी फेकून दिला पाहिजे. विचारांवरून आपापसात वाद घालणं सोडून दिलं पाहिजे. पुढील 50 वर्षे आपण फक्त आणि फक्त हिंदू आहोत. तुम्हाला कोणतेही महापुरुष आवडू देत, कोणताही देव आवडू दे, कोणत्याही उपासना पद्धतीचे तुम्ही उपासक असा त्याने काहीही फरक पडणार नाही. सामूहिकरीत्या आपण हिंदू आहोत. फक्त आणि फक्त हिंदू. तरंच ही कम्युनिस्ट, वाळवंटी कीड आपण उमटून टाकू शकतो.
।। हर हर महादेव ।।
जयेश शत्रुघ्न मेस्त्री