470 नागरिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासनाला सादर
वणी,
Encroachment on Hindu cemetery शहरातील हिंदू स्मशानभूमीवरील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नाने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले असून, ही जागा तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या संदर्भात शुक्रवार, 8 मे रोजी वणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी व मंत्र्यांना तब्बल 470 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, वणी येथील शीट क्रमांक 11 मधील प्लॉट क्रमांक 2, क्षेत्रफळ 40 हजार 471.7 चौ. मीटर (10 एकरपेक्षा अधिक) जागा शासनाने 10 जुलै 1929 रोजी सीपी अँड बेरार म्युनिसिपालिटी अॅक्ट 1922 च्या कलम 3 (1) 3-क अंतर्गत हिंदू स्मशानभूमीसाठी वणी नगर परिषदेच्या ताब्यात दिली होती. विशेष म्हणजे या जागेसाठी कोणतीही किंमत किंवा भाडे आकारण्यात आले नव्हते.
ही जागा सर्वधर्मीयांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली जात असल्याने तिचे संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी नप प्रशासनाची असल्याचे या निवेदनात नमूद आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंदाजे 4 ते 5 एकर जागेवर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांनी अतिक्रमण करून घरबांधणी केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. वणी शहरात मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू अशा तीन स्मशानभूमी अस्तित्वात आहेत. मुस्लिम व ख्रिश्चन स्मशानभूमींना संरक्षण भिंती असल्याने त्या सुरक्षित आहेत. मात्र हिंदू स्मशानभूमी खुली असल्यामुळे तेथे अतिक्रमण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Encroachment on Hindu cemetery नगर परिषदेकडून मोक्षधाम सेवा समितीकडे स्मशानभूमी विकास व देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी वाढत्या अतिक्रमणामुळे विकासकामात अडथळे निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. स्मशानभूमीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करावी तसेच सर्व अतिक्रमण हटवून जागा अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अंत्यसंस्कारासाठी जागेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना विलास पारखी, पांडुरंग लांजेवार, सतीश पिंपळे, मुन्नालाल तुगनायत, राहुल लाल, स्वप्निल कावडे, अशोक पोटदुखे, अजय सातपुते, डॉ. अक्षय तुगनायत, रूपक डवरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.