दिग्रसला ‘निधी’ व ‘ग्रो-कॅपिटलचे’ ठेवीदार गोत्यात

    दिनांक :09-May-2026
Total Views |
भरदिवसा लोकांना लुटले
अभय इंगळे
दिग्रस, 
'Jansangharsh Urban NIdhi' येथील एकाने 40 कोटींनी तर दुसऱ्याने चक्क 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांनी लोकांना गंडवले. तर ऑनलाईन व्यवहारात अनेकांची फसगत झाली. हे सारेच आज हतबल होऊन बसले, दोन पैशांच्या लालसेने जवळचा पैसा गमावून मुद्दल रक्कम मिळावी यासाठी देवाला साकडे घालताना दिसत आहेत. अचानक श्रीमंत झालेला प्रणीत मोरे याने आपल्या श्रीमंतीचे असे प्रदर्शन केले होते की येथील अनेकजण त्याच्याशी आर्थिक व्यवहार करून आणि त्याने स्थापन केलेल्या जनसंघर्ष अर्बन निधीत आपल्या कष्टाचे पैसे जमा केले होते. आज त्या ठेवीदारांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
 
 
bank
 
केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत Jansangharsh Urban NIdhi जनसंघर्ष अर्बन निधीची नोंद असल्याने या बँकेचा सहकार क्षेत्राशी काहीएक संबंध नसल्याचे पुढे आले आणि 6,200 खातेदारांचे 44 कोटी रुपये जनसंघर्ष अर्बन निधीत अडकून पडले. परतावा कधी मिळेल हे आज कोणीच सांगत नसल्याने ठेवीदार गोत्यात आले आहेत. पैशांच्या हव्यासामुळे येथील गिरीश दुधे हा पोलिस कोठडीत जाऊन बसला. हा एका तथाकथित कंपनीशी जुळला आणि ‘एका वर्षात दामदुप्पट’चा प्रचार प्रसार केला. याच्या बोलण्यावरून अनेकांनी आयुष्यभराची बचत, निवृत्तीची पुंजी, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले लाखो रुपये विश्वास ठेवून गुंतवले आज त्या लोकांच्या हातात केवळ चिंता, अश्रू आणि अनिश्चित भविष्य उरले आहे. आम्ही परक्या नाही, तर आपल्याच ओळखीच्या, शिकलेल्या लोकांवर विश्वास ठेवला म्हणून फसलो, ही भावना अनेक गुंतवणूकदारांची आहे. या दोन लुटारूंचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून व पोलिस तपासही करतच आहेत. मात्र आज अनेकांच्या कष्टाचे पैसे अडकून पडले असून नेमके ते कधी मिळतील याचा अंदाज नसल्याने ठेवीदार चांगलेच गोत्यात आले असून पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत.

जामीन मिळण्यासाठी भामट्यांची धडपड
निधीचा मास्टरमाईंड प्रणीत मोरे, साहिल जयस्वाल, प्रीतम मोरे, देवानंद मोरे, जयश्री मोरे, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल तसेच ग्रो-कॅपिटल कंपनीत गुंतलेल्या दुधे कुटुंबातील गिरीश दुधे, विनोद दुधे, गिरीशचा मुलगा मंदार व पत्नी अपर्णा हे सारे लुटारू आज तुरुंगाची हवा खात आहेत आणि चांगले वकील लावून जमानतीसाठी धडपडत आहेत. मात्र यांच्यामुळे आज हजारो घरांचे भविष्य अंधारात गेले याला हेच मुख्य जबाबदार असल्याने यांचा जामीन मंजूर होता कामा नये, अशी गुंतवणूकदार मनोमन प्रार्थना करत आहेत.