उकणी खुल्या कोळसा खाणीत भीषण भूस्खलन

    दिनांक :09-May-2026
Total Views |
दोन डंपर मातीखाली गाडले गेले
चालकांच्या प्रसंगावधानाने जीवहानी टळली

वणी, 
Landslide in Ukani coal mine वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोली) उकणी खुल्या कोळसा खाणीत गुरुवार, 8 मे रोजी दुपारी 2 च्या दरम्यान भीषण भूस्खलनाची घटना घडली. गाळयुक्त मातीचा प्रचंड लोंढा खाली आल्याने काम सुरू असलेले दोन डंपर मातीच्या ढिगाèयाखाली दबले. मात्र, चालक प्रसंगावधान राखत वेळीच डंपरमधून बाहेर पडल्याने जीवहानी टळली. उकणी खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या सहाय्याने मातीचे उत्खनन करून कोळसा काढण्याचे काम सुरू असते. सुमारे 100 मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर मिळत असल्याने खाणीत खोल खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वरच्या भागात तयार करण्यात आलेल्या शिल्ड (तलाव) मध्ये साठविले जाते.
 
 
ukani
 
Landslide in Ukani coal mine  गुरुवारी कोळसा उत्खननाचे काम सुरू असताना अचानक शिल्डला लावलेली पार सरकल्याने गाळयुक्त पाणी आणि मातीचा मोठा लोंढा खाणीत कोसळला. यात काम सुरू असलेले दोन डंपर पूर्णपणे मातीखाली गाडले गेले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही चालकांनी जीवाच्या आकांताने डंपरमधून बाहेर पडत इतर कर्मचाèयांच्या मदतीने स्वतःचा जीव वाचविला. या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. वेकोली प्रशासन सुरक्षा सप्ताहाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करते; मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप कामगारांनी केला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये काही कामगारांना जीव गमवावा लागल्याचेही कर्मचाèयांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाèयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी वेकोली कामगारांकडून करण्यात येत आहे.