तिरुवनंतपुरम,
Monsoon expected on Kerala coast देशात मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेवर आणि काहीसा वेगाने पुढे सरकत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. दक्षिण गोलार्धातील वातावरणात झालेल्या बदलांसोबतच हिंदी महासागर परिसरात तयार होत असलेली पोषक परिस्थिती यामुळे मान्सूनची वाटचाल अधिक सक्रिय झाली असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान केरळ किनारपट्टीवर १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे.

ऑस्ट्रेलियामधील हवामान विभागाने २०२५–२६ या उत्तर भागातील पावसाळी हंगाम अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केल्यानंतर वातावरणीय प्रणालीत मोठा बदल दिसून येतो. या बदलाचा परिणाम उत्तर गोलार्धातील हवामानावर होतो आणि भारतीय महासागर परिसरात कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती होऊन मान्सूनसाठी अनुकूल स्थिती तयार होते. सध्या 'आंतर उष्ण कटिबंधीय अभिसरण पट्टा' उत्तरेकडे सरकत असल्याचे दिसून येत असून हा पट्टा मालदीवच्या उत्तरेकडून दक्षिण श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांपर्यंत पसरलेला आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून पोहोचण्यापूर्वी या पट्ट्यातील हालचाली अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, हवामान विभागाने दक्षिण भारतातील अनेक भागांसाठी पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, तसेच दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरातही पावसाचा जोर वाढू शकतो असे सांगितले जाते. दुसरीकडे उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी अचानक वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.