modern agriculture सिरोंचा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी नईम सय्यद यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करत मेल-फिमेल भात पिकाची यशस्वी लागवड करून परिसरातील शेतकर्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आज परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल पाच एकर क्षेत्रात त्यांनी या विशेष भात पिकाची लागवड केली असून त्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जात आहे.
मेल-फिमेल भात लागवड ही सामान्य भात शेतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अत्यंत बारकाईने करावी लागणारी शेती मानली जाते. या पद्धतीमध्ये दोन वेगवेगळ्या लाईनचे रोप वापरले जातात. मेल लाईन म्हणजे परागकण देणारी झाडे आणि फिमेल लाईन म्हणजे बियाणे तयार करणारी झाडे. या दोन्ही लाईन विशिष्ट अंतर ठेवून शेतात लावल्या जातात. योग्य प्रमाणात रांगांची मांडणी करणे हे या शेतीतील सर्वात महत्वाचे काम मानले जाते. या पिकात फिमेल लाईनचे उत्पादन वाढावे, यासाठी मेल लाईनमधून योग्य वेळी परागीकरण होणे आवश्यक असते. त्यामुळे शेतात नियमित देखरेख ठेवावी लागते. वार्याच्या मदतीने परागकण फिमेल लाईनवर पोहोचावेत यासाठी काही वेळा शेतकरी दोरीच्या सहाय्याने झाडे हलवण्याचे काम देखील करतात. त्यामुळे या शेतीमध्ये केवळ मेहनतच नाही तर तांत्रिक ज्ञानाचीही मोठी गरज असते.
नईम सय्यद यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रोपवाटिका तयार करून योग्य वेळेत लागवड केली. पाण्याचे व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, रोग व कीड नियंत्रण तसेच नियमित निरीक्षण यामुळे पीक उत्तम स्थितीत आले आहे. या पिकासाठी सामान्य भातापेक्षा अधिक मजूर व अधिक काळजी घ्यावी लागत असल्याने खर्च आणि मेहनत दोन्ही मोठ्या प्रमाणात लागतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न देखील तितकेच फायदेशीर ठरत आहे. या भात पिकाला बाजारात मोठी मागणी असून प्रतिक्विंटल सुमारे 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.modern agriculture एकरी साधारण दहा ते बारा क्विंटल उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकर्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी आता या आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळण्याचा विचार करत आहेत.