गोंदिया
Ambedkari Vichar Manch सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर खोटी, बनावट आयडी तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली असली तरी त्याचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर त्याने केलेल्या पोस्टला लाईक, कमेंट्स व शेअर करणार्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी विचार मंच, गोंदिया जिल्हाच्या वतीने शनिवारी ९ मे रोजी येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.

Ambedkari Vichar Manch यावेळी माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे, राजेश नंदागवळी, अजित मेश्राम, हितेश डोंगरे, किशोर मेश्राम, सैलेश जांभुळकर, व्यंकट खोब्रागडे, धनंजय वैद्य, अतुल सतदेवे आदी उपस्थित होते. प्रसंगी डोंगरे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फेसबुकवर दिनेश ब्राम्हणकर या आयडीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावर सडक अर्जुनी येथील रोशन बडोले यांनी ८ मे रोजी डुग्गीपार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावणकर या व्यक्तीने फेसबुकवर दिनेश ब्राम्हणकर या नावाने बनावट आयडी तयार करून हे कृत्य केल्याचे पुढे आले. यावर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक केली. मात्र, सदर आरोपीवर अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नव्हता.
Ambedkari Vichar Manch दरम्यान, सर्व समाज बांधवांनी एकत्र येत या प्रकरणी ९ मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन सादर केले असता सदर गुन्ह्यात वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी आरोपी गौरेश बावणकर याने केलेले कृत्य हे घृणास्पद असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी. व त्याने केलेल्या पोस्टवर इतरांनी केलेले कमेंट्स, लाईक, शेअर आदीचा तपास करून संबंधितावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला.
तपासात आरोपी गौरेश बावणकर याने दिनेश ब्राम्हणकर या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे उघड झाले. दरम्यान, त्यास अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची पोलिस कोठडी दिली असून आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
- गणेश वनारे, पोलिस निरीक्षक, डुग्गीपार