bhandara drug news शहरात तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अमली पदार्थांचा धंदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरात अमली पदार्थांचा काळा बाजार चालवणाऱ्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या एन.डी.पी.एस. पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १२ लाख ६५ हजार रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) सदृश ड्रग्ज जप्त केले. भाड्याच्या घरातून सुरू असलेला हा नशेचा कारभार उघडकीस आला असून, नागपूर कनेक्शन असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेमुळे भंडाऱ्यात अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कपिल गंगाधर खोब्रागडे, वय ४२ हा आंबेडकर वॉर्ड, समाज भवनाजवळ, भंडारा येथे पुरुषोत्तम रामटेके यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याचे मूळ वास्तव्य नागपूर शहरातील नंदनवन परिसरातील साई मंदिर रोड, राजेंद्र नगर, डॉ. आंबेडकर चौक येथे आहे. एन.डी.पी.एस. पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. या झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून ६३.२९० ग्रॅम एमडी सदृश अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. या अमली पदार्थाची बाजारातील अंदाजे किंमत १२ लाख ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून ७९ हजार ९६० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८(क) आणि २२(क) अंतर्गत गुन्हा क्रमांक १०५७/२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
जिल्ह्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, युवकांना व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्यांविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा शहरात खळबळ उडाली असून, अमली पदार्थांच्या नेटवर्कबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.bhandara drug news दरम्यान, आरोपीकडून जप्त करण्यात आलेला एवढ्या मोठ्या प्रमाणातील एमडी ड्रग्जचा साठा नेमका कुठून आणला गेला, त्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे आणि हा अमली पदार्थ कोणाला विकला जाणार होता, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात लाखो रुपयांचा ड्रग्ज साठा सापडल्याने या काळ्या व्यवसायाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासातून आणखी मोठे नेटवर्क समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.