चंद्रपूर,
winds lash chandrapur जिल्ह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि वादळी वार्यासह काही ठिकाणी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. चंद्रपूर महानगरासह पोंभुर्णा, नागभीड तालुक्यात जोरदार, तर मूल, सिंदेवाही तालुक्यात हलक्या सरी आल्या. या पावसामुळे सायंकाळी नागरिकांना कडाक्याच्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.
शनिवारी सकाळीपासून चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी 3 वाजेनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. पोंभुर्णा तालुक्यात वादळ व विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. यावेळी वार्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक पानठेले आडवे झाले, तर अनेक दुकानांवरील शेड उडाले. पोंभुर्णा येथील गुरुदास जनरल स्टोअर्सचे मालक संजोग शिरभय्ये यांच्या गोडाऊनवरील टिनाचे शेड उडून शेजारच्या घरावर पडले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी दूकान मालकाचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील विटाभट्टी आणि शेतामधील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागभीड तालुक्याच्या मुख्य ठिकाणी वादळासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर याच तालुक्यातील तळोधी बाळापूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सिंदेवाही, मूल तालुक्यातही जोरदार वादळी वार्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे.winds lash chandrapur दिवसभराचा कडक उकाडा कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसाने उन्हाळी धान, आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.