बंगालमध्ये भाजपचे नवे पर्व...शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदी विराजमान

    दिनांक :09-May-2026
Total Views |
कोलकाता,
Shubhendu Adhikari takes office as Chief Minister पश्चिम बंगालच्या राजकारणात आज ऐतिहासिक बदलाची नोंद झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत सत्ता हाती घेतली. यासह पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली होती.
 
 

Chief Minister 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्मृती इराणी, शिवराज सिंह चौहान, चिराग पासवान तसेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रूपा गांगुली यांनी हा दिवस पश्चिम बंगालच्या जनतेसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगत राज्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली.  शपथविधी सोहळ्यात एक भावनिक क्षणही पाहायला मिळाला. पंतप्रधान मोदी यांनी बंगाल भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची भेट घेत त्यांना आलिंगन दिले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. या प्रसंगाची मोठी चर्चा रंगली. दरम्यान, भाजपच्या काही नव्या आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निमित्र पॉल आणि शंकर घोष यांची नावे चर्चेत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करत राज्यात मोठा राजकीय बदल घडवून आणला होता. शपथविधीसाठी ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
 
 

पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. कोलकाता येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.दिलीप घोष यांनी पश्चिम मेदिनीपूरमधील खरगपूर सदर मतदारसंघातून विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली. त्यांनी सात वेळा आमदार राहिलेल्या ज्ञान सिंह सोहनपाल यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकली. पक्ष संघटना तळागाळात मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. जंगलमहाल आणि उत्तर बंगाल परिसरात त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यात मोठी भूमिका बजावली होती. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.दिलीप घोष यांच्यासह भाजपच्या आणखी पाच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. निशीथ प्रमाणिक, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया आणि खुदीराम टुडू यांचाही नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपालांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला. राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर आला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाने बंगालच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.