मुख्यमंत्रीपदाची शपथ, पण ना गाडी ना सोनं!

शुभेंदू अधिकारी यांच्या साधेपणाची चर्चा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
कोलकाता,
simplicity of Shubhendu Adhikari पश्चिम बंगालच्या राजकारणात आज नवे पर्व सुरू होत असून भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या राजकीय यशाइतकीच चर्चा सध्या त्यांच्या साध्या राहणीमानाची होत आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे स्वतःची मोटारगाडी नाही, तसेच सोन्याचे दागिनेही नाहीत. त्यांच्या जवळील रोख रक्कम अवघी बारा हजार रुपये असल्याचे समोर आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार शुभेंदू अधिकारी यांची एकूण मालमत्ता सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये जंगम आणि स्थावर अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. विविध बँकांमध्ये त्यांची अनेक खाती असून त्यामधील ठेव रक्कम सुमारे सात लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय बचत योजना, किसान विकास पत्र, टपाल बचत योजना आणि जीवन विमा योजनांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे.
 
 

s35456 
स्थावर मालमत्तेमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील शेतीजमीन तसेच काही निवासी मालमत्तांचा समावेश आहे. नंदीग्राम परिसरासह इतर भागांमध्ये त्यांच्या नावावर शेतीजमीन असून तामलुक आणि कुमारपूर येथे सदनिका व वडिलोपार्जित मालमत्ताही असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.सुवेंदू अधिकारी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पराभव करत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली होती. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने राज्यात मोठे यश मिळवत बहुमताचा आकडा पार केला. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे, शुभेंदू अधिकारी यांच्यावर कोणतेही बँक कर्ज किंवा सरकारी थकबाकी नाही. आमदार म्हणून मिळणारे मानधन, खासदार निवृत्तीवेतन आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.