रानडुकरांच्या हल्ल्यात तीन मजूर जखमी

    दिनांक :09-May-2026
Total Views |
कोरची, 
wild boar attack तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या नागरिकांवर रानडुकरांनी अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका महिलेसह तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जंगलात एकाच वेळी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणार्‍या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना तालुक्यातील बोडेना जंगल परिसरात घडली.
 
 

रानडुकरांच्या हल्ल्या 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बोडेना जंगल परिसरात सुमारे 15 ते 20 नागरिक तेंदूपत्ता तोडणीचे काम करत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जंगलात जात असतात. दरम्यान अचानक जंगलातून बाहेर आलेल्या रानडुकरांनी नागरिकांवर हल्ला केला. हा हल्ला इतका अचानक झाला की, अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलातून धावत पळ काढावा लागला.wild boar attack या हल्ल्यात पुष्पा कालिदास भैसारे (50), रा. कोरची ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच कृष्णा पडोटी (55) रा. कोरची आणि नंदकिशोर बोरकर (55) रा. भीमपूर हे देखील जखमी झाले आहेत. जखमी महिलेला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामस्थांनी दुचाकीच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तेंदूपत्ता हंगामात दररोज शेकडो मजूर जंगलात जात असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून जंगलात जाण्यास नागरिक धास्तावले आहेत. विशेषतः महिला मजूर आणि वृद्ध नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता धोका लक्षात घेता वनविभागाने सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.