युद्धाला विराम, शांततेला सलाम!

युद्ध थांबवण्याची ट्रम्प यांची मोठी घोषणा

    दिनांक :09-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump to stop the war अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जगातील अनेक संघर्षांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले, मात्र रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवणे हेच आपले सर्वात मोठे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. हे युद्ध संपुष्टात आले, तर तो आपल्या दृष्टीने मोठा शांतता करार ठरेल, असेही त्यांनी म्हटले.ट्रम्प यांनी या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वाधिक भीषण संघर्ष बनल्याचा दावा त्यांनी केला. दर महिन्याला हजारो नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू होत असल्याने हा रक्तपात तातडीने थांबणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

Trump to stop the war 
याच पार्श्वभूमीवर त्यांनी ९ मे ते ११ मे या कालावधीत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान हा युद्धविराम लागू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या काळात दोन्ही देशांकडून कोणतीही लष्करी कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.ट्रम्प यांच्या मते, या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मान्यता दिली आहे. तसेच या करारांतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या एक हजार कैद्यांची अदलाबदल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. हा तात्पुरता युद्धविराम पुढे कायमस्वरूपी शांततेकडे नेणारा पहिला टप्पा ठरू शकतो, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू असून सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.