भंडारा,
bhandara news कडाक्याचं ऊन्ह असतानाही, जो बहरतो आणि आपल्या सुगंधाने मोहिनी घालतो, तो मोगरा... आठ मे रोजी हा मोगरा भंडाऱ्यात फुलणार होता! त्याचा प्रचार प्रसार झाला... श्रोतेही पोहोचले मात्र कुलूप बंद सभागृह पाहून ते हिरमुसलेच! मोगरा तर फुलला नाहीच, मात्र आयोजकांना नको ते ऐकावे लागले हे तेवढेच खरे!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्म वर्षानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन कार्याचा जागर व्हावा या हेतूने, "मोगरा फुलला" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आठ मे रोजी भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रशासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्देशानुसार करण्यात आली. प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे निरूपण गायिका सन्मिता शिंदे यांचे अभंग व भावगीत गायन असे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
पहिल्यांदा भंडाऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून वेगळा काहीतरी कार्यक्रम साकारला जाणार होता. त्यामुळे रसिक भंडारेकरांना याची उत्सुकता होती. कार्यक्रमाला लोकांनी यावे यासाठी, प्रशासनाच्या यंत्रणेतून याची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. वर्तमानपत्रांमध्ये कार्यक्रमाच्या असण्यासंदर्भातील वृत्तही छापून आले.
आठ मे चा दिवस उजाडला. दिलेल्या वेळेप्रमाणे अनेक जण कार्यक्रम स्थळी पोहोचले मात्र प्रत्यक्षात तेथील चित्र पाहून तेही अवाक झाले. ज्या सभागृहात हा कार्यक्रम होणार होता त्याला चक्क कुलूप होते. प्रेक्षकांनी आजूबाजूला चौकशी केली तर असा कुठलाच कार्यक्रम नाही असे सांगितले गेले.bhandara news मग ज्यांनी ज्या वर्तमानपत्रात बातमी वाचली, त्या कार्यालयाकडूनही खात्री करून घेण्याचे धाडस या प्रेक्षकांनी केले. तोपर्यंत आठ तारखेचा कार्यक्रम रद्द झाल्याचे कुणालाही सांगितले गेले नव्हते. या सर्व घडामोडीनंतर हा हा कार्यक्रम आता पंधरा रोजी होणार असल्याचे प्रशासनातील एका सूत्राने सांगितले. मात्र या सर्व प्रकारात नवीन काहीतरी सांस्कृतिक मेजवानी मिळणार या विचाराने सभागृहाजवळ दाखल झालेल्या प्रेक्षक श्रोत्यांची नाराजी प्रशासनाला ओढवून घ्यावी लागली. अनेकांनी चक्क शिव्यांची लाखोळीही वाहिली.
कार्यक्रम जर रद्द झाला, तर त्याची सूचना देण्याचे सौजन्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने का दाखविले नाही? असा प्रश्न पडतो. लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना होत नसेल तर, अशा अधिकाऱ्यांकडून अपेक्षा कशी केली जाऊ शकते. रद्द झालेल्या कार्यक्रमाची माहिती देण्याचे न दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रसंगावधान असू नये, याचे नवल आहे. आधीच शासनाच्या कुठल्याही कार्यक्रमांना लोकांचा प्रति फार नगण्य असतो. अशात जर, अशा पद्धतीने त्यांची फसवणूक होणार असेल, तर पुढे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळविताना नक्कीच यंत्रणेला घाम गाळावा लागू शकतो.