प्रत्येक नळाला तोटी आणि मिटरची गरज
पांढरकवडा,
Water wastage in rural areas ग्रामीण भागात नळांना तोटी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एका बाजूला उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाण्यासाठी संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असताना दुसèया बाजूला काही ठिकाणी नळातून तासन्तास पाणी वाहत असल्याने जलसंपत्तीचा विनाकारण नाश होत आहे. शहरी भागात घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी, शुल्क आणि पाणी मीटरची व्यवस्था केली जाते. त्यामुळे पाण्याच्या वापरावर काही प्रमाणात नियंत्रण राहते. मात्र ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पाणी वापरासाठी मीटर नसल्याने आणि योग्य नियोजनाचा अभाव असल्याने मनमानी पद्धतीने पाण्याचा वापर केला जात आहे.
विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये सार्वजनिक नळांना तोटीच नसल्यामुळे गरज नसतानाही पाणी सतत वाहत राहते. परिणामी लाखो लिटर पाणी वाया जात असून भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. भूजल पुनर्भरणाबाबत प्रशासन आणि नागरिक दोघांकडूनही अपेक्षित गांभीर्य दिसून येत नाही. पाणी उपलब्ध आहे तोपर्यंत वापरायचे, अशी मानसिकता वाढत असल्याने भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर काही राजकीय मंडळी मोर्चे, घागर आंदोलन आणि प्रशासनावर दबावतंत्र वापरत टँकर सुरू करण्याची मागणी करतात. मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना ठरते. दीर्घकालीन नियोजन, पाणी बचत, भूजल पुनर्भरण आणि नियंत्रित वापर यावर ठोस पावले उचलण्याची तयारी मात्र फारशी दिसून येत नाही.
Water wastage in rural areas ग्रामीण भागातील प्रत्येक घरी आणि प्रत्येक नळाला तोटी, तसेच पाणी मीटर बसविणे ही काळाची गरज बनली आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल. मात्र अशा निर्णयांमुळे राजकीय नुकसान होईल या भीतीने अनेक लोकप्रतिनिधी कठोर भूमिका घेण्यास टाळाटाळ करतात, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. आता तरी सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत पाणी बचतीबाबत जनजागृती करणे, ग्रामपंचायतींवर दबाव निर्माण करणे आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा भविष्यात पाण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती आहे.