शपथविधीच्या मंचावर मोदींनी कोणाचे केले चरण स्पर्श!

    दिनांक :09-May-2026
Total Views |
कोलकाता,
Whose feet did Modi touch पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच त्यांनी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्यानंतर त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. हा प्रसंग पाहून उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली, तर त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार होते. ९८ वर्षीय माखनलाल सरकार यांनी पक्षाच्या उभारणीत आणि राष्ट्रवादी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी तळागाळात काम करत संघटन बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले होते.
 
bangla today
 
 
१९५२ मध्ये काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत सहभाग घेतला होता. त्या आंदोलनादरम्यान त्यांना अटकही करण्यात आली होती. भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये त्यांच्याकडे पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या भागांच्या संघटन समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अल्पावधीतच त्यांनी हजारो नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम केले. यानंतर त्यांनी सलग सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्या काळात इतका दीर्घकाळ एका पदावर राहणे हे विशेष मानले जात होते. आजच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी त्यांचा केलेला सन्मान हा पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांप्रती आदर व्यक्त करणारा क्षण ठरला. दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली.