डिजिटल मालमत्तेसाठी इच्छापत्र

    दिनांक :09-May-2026
Total Views |
तंत्रवेध
डॉ. दीपक शिकारपूर
 
digital assets तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यक्तीच्या मालमत्तेचे स्वरूप बदलले आहे. आज अनेक लोकांची मौल्यवान संपत्ती ही त्यांच्या संगणकीय साधनांमध्ये, नेटवर आधारित खात्यांमध्ये, चलनरहित व्यवहारांमध्ये आणि गुप्त संकेतांच्या माध्यमातून साठवलेल्या साधनांमध्ये असते. या डिजिटल मालमत्तेचे योग्य नियोजन आणि तिच्या उत्तराधिकाराचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी इच्छापत्र तयार करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
 
 
digital assets
 
 
आजच्या आधुनिक युगात माणसाचे आयुष्य केवळ भौतिक संपत्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. पूर्वी जमीन-जुमला, घर, दागिने, रोकड अशा स्वरूपातील मालमत्तेला महत्त्व होते; आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यक्तीच्या मालमत्तेचे स्वरूप बदलले आहे. आज अनेक लोकांची मौल्यवान संपत्ती ही त्यांच्या संगणकीय साधनांमध्ये, नेटवर आधारित खात्यांमध्ये, चलनरहित व्यवहारांमध्ये आणि गुप्त संकेतांच्या माध्यमातून साठवलेल्या साधनांमध्ये असते. अशा प्रकारच्या संपत्तीला ‘डिजिटल मालमत्ता’ म्हणतात. या डिजिटल मालमत्तेचे योग्य नियोजन आणि तिच्या उत्तराधिकाराचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी इच्छापत्र तयार करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. डिजिटल मालमत्तेसाठीचे इच्छापत्र आणि पारंपरिक कायदेशीर इच्छापत्र यामध्ये काही महत्त्वाचे फरक आढळतात. पारंपरिक इच्छापत्रामध्ये प्रामुख्याने जमीन, घर, दागिने, रोख रक्कम यासारख्या भौतिक मालमत्तेचे वितरण कसे करायचे, याचा उल्लेख असतो. या मालमत्तेचे स्वरूप स्थिर आणि स्पष्ट असल्यामुळे त्यांचे हस्तांतरण तुलनेने सोपे असते. परंतु डिजिटल मालमत्तेच्या इच्छापत्रामध्ये संपत्तीचे स्वरूप अमूर्त आणि तांत्रिक असते. यामध्ये विविध खाती, गुप्त संकेत, प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा प्रणाली यांचा समावेश असल्यामुळे त्याचे व्यवस्थापन अधिक जटिल ठरते. पारंपरिक इच्छापत्रामध्ये केवळ मालमत्तेचे वाटप नमूद करणे पुरेसे असते, तर डिजिटल इच्छापत्रामध्ये त्या मालमत्तेचा हक्क कसा मिळवायचा, कोणती माहिती जतन करायची किंवा हटवायची याबाबत सविस्तर सूचना देणे आवश्यक असते.
 
डिजिटल इच्छापत्रामध्ये गोपनीयतेला विशेष महत्त्व दिले जाते. कारण वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणावर साठवलेली असते. याशिवाय, तांत्रिक बदल आणि विविध सेवांच्या नियमांमुळे डिजिटल इच्छापत्र वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे असते. ते पारंपरिक इच्छापत्राच्या तुलनेत अधिक गतिमान स्वरूप दर्शविते. डिजिटल मालमत्तेमध्ये विविध प्रकार येतात. उदाहरणार्थ, सामाजिक माध्यमांवरील खाती, संदेश सेवा, ई-मेलसारखी पत्रव्यवहाराची साधने, चलनरहित गुंतवणूक साधने, चित्रे, लेखन, व्हिडीओ, संकेतशब्दांनी संरक्षित माहिती तसेच ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित साधने. अनेकदा ही मालमत्ता आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असते, तर काही वेळा भावनिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची असते. व्यक्तीच्या निधनानंतर ही सर्व माहिती आणि साधने योग्य व्यक्तीकडे पोहोचावीत यासाठी इच्छापत्र आवश्यक ठरते.
डिजिटल मालमत्तेसाठी इच्छापत्राचे महत्त्व
1. व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना किंवा वारसांना त्या मालमत्तेची माहिती मिळविणे अत्यंत कठीण ठरू शकते. अनेक खात्यांना पासवर्ड दुहेरी सुरक्षा व्यवस्था, गुप्त संकेत इत्यादींची आवश्यकता असते. ही माहिती कोणालाही माहिती नसेल, तर त्या खात्यांमध्ये प्रवेश मिळविणे अशक्य होऊ शकते. अशा परिस्थितीत मौल्यवान माहिती कायमची हरवू शकते.
2. काही डिजिटल मालमत्तेचा आर्थिक उपयोग असतो. उदाहरणार्थ, चलनरहित गुंतवणूक, डिमॅट खाती (शेअर्स म्युच्यअल फंड्स इत्यादी) ऑनलाईन व्यवसाय, जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न, लेखन किंवा कलाकृतींचे मानधन. या साधनांचा योग्य वारसा ठरवला गेला नाही, तर त्या उत्पन्नाचा लाभ कुणालाही मिळणार नाही. त्यामुळे इच्छापत्रामध्ये या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
3. गोपनीयता. व्यक्तीच्या आयुष्यातील वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणावर डिजिटल स्वरूपात साठवलेली असते. त्यामध्ये खाजगी संवाद, वैयक्तिक चित्रे, दस्तावेज इत्यादींचा समावेश होतो. या माहितीचे संरक्षण करणे आणि ती कोणाला द्यायची किंवा नष्ट करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे. इच्छापत्राच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती आपली गोपनीयता जपण्याची व्यवस्था करू शकते.
4. कायदेशीर गुंतागुंत टाळणे. डिजिटल मालमत्तेच्या बाबतीत स्पष्ट नियम नसल्यामुळे अनेक वेळा कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. इच्छापत्र असल्यास मालमत्तेचे वितरण स्पष्ट होते आणि वाद टाळता येतात.
महत्त्वाच्या गोष्टींची काळजी
1. आपल्या सर्व डिजिटल मालमत्तेची यादी तयार करणे आवश्यक आहे. यात कोणती खाती आहेत, त्यांचे स्वरूप काय आहे, त्यांचा उपयोग काय आहे याची सविस्तर माहिती लिहावी. ही यादी अद्ययावत ठेवणेही गरजेचे आहे.
2. प्रत्येक खात्यासाठी प्रवेशाची माहिती सुरक्षितपणे साठवणे आवश्यक आहे. संकेतशब्द, गुप्त प्रश्न, दुहेरी सुरक्षा व्यवस्था यांची माहिती सुरक्षित ठिकाणी ठेवावी. ही माहिती थेट इच्छापत्रामध्ये लिहिणे टाळावे. कारण इच्छापत्र सार्वजनिक होऊ शकते. त्याऐवजी स्वतंत्र सुरक्षित नोंद तयार करून ती विश्वासू व्यक्तीकडे द्यावी.
3. वारसांची निवड. प्रत्येक डिजिटल मालमत्तेसाठी योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आर्थिक मालमत्ता कुटुंबातील जबाबदार सदस्याला द्यावी तर वैयक्तिक माहितीबाबत विश्वासू व्यक्तीची निवड करावी. काही वेळा वेगवेगळ्या मालमत्तेसाठी वेगवेगळे वारस नेमणे योग्य ठरते.
4. डिजिटल कार्यवाहक नेमणे. पारंपरिक इच्छापत्रासाठी कार्यवाहक नेमला जातो त्याप्रमाणेच डिजिटल मालमत्तेसाठीही एक जबाबदार व्यक्ती नेमावी. ही व्यक्ती इच्छापत्रानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकेल. तिला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
5. स्पष्ट सूचना देणे. कोणती मालमत्ता जतन करायची, कोणती हटवायची, कोणती हस्तांतरित करायची याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत. यामुळे कार्यवाहकाला निर्णय घेणे सोपे होते.
6. कायदेशीर वैधता सुनिश्चित करणे. इच्छापत्र कायद्याने मान्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने तयार करणे, साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
डिजिटल मालमत्तेच्या संदर्भात काही आव्हानेही आहेत. तंत्रज्ञान सतत बदलत असल्यामुळे आजची माहिती उद्या अप्रासंगिक होऊ शकते. त्यामुळे इच्छापत्र नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे तसेच विविध सेवांच्या नियमांमध्ये फरक असतो. काही सेवा मृत्यूनंतर खाते बंद करतात तर काही ठिकाणी वारसांना अ‍ॅक्सेस दिला जातो. त्यामुळे या नियमांची माहिती ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय, सुरक्षा ही मोठी चिंता आहे. संकेतशब्द आणि गुप्त माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित साठवण आणि मर्यादित प्रवेश यावर भर द्यावा. भावनिक दृष्टिकोनातून पाहिले तर डिजिटल मालमत्ता अनेक आठवणींचा साठा असते. छायाचित्रे, संदेश, व्हिडीओ हे सर्व कुटुंबासाठी अमूल्य ठेवा असतो. इच्छापत्राच्या माध्यमातून या आठवणी जतन करता येतात आणि पुढील पिढ्यांना देता येतात. भविष्यात डिजिटल मालमत्तेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी जग, चलनरहित अर्थव्यवस्था यामुळे व्यक्तीचे आयुष्य अधिकाधिक डिजिटल होत आहे. त्यामुळे इच्छापत्रामध्ये या बाबींचा समावेश करणे अपरिहार्य ठरणार आहे. शेवटी, डिजिटल मालमत्तेसाठी इच्छापत्र तयार करणे ही केवळ तांत्रिक बाब नसून ती जबाबदारीची जाणीव आहे.digital assets आयुष्यभर साठवलेल्या संपत्तीचे योग्य नियोजन करणे, कुटुंबाचे हित जपणे, गोपनीयतेचे संरक्षण करणे आणि भविष्यातील अडचणी टाळणे या सर्व गोष्टींसाठी इच्छापत्र अत्यंत उपयुक्त ठरते.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या डिजिटल मालमत्तेचा विचार करून योग्य वेळी इच्छापत्र तयार करणे आवश्यक आहे. यातून केवळ संपत्तीचे संरक्षण होत नाही तर आपल्या आठवणी, विचार आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविता येतो. त्यामुळे डिजिटल युगात इच्छापत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अजून एक मुद्दा म्हणजे डिजिटल उपकरणे. डिजिटल साधनांमध्ये मोबाईल दूरध्वनी संच, संगणक, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो. या साधनांमध्ये व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक माहिती साठवलेली असते. छायाचित्रे, संपर्क क्रमांक, संदेश, लेखन, कागदपत्रे तसेच विविध खात्यांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक गुप्त संकेत ही सर्व माहिती या उपकरणांमध्ये सुरक्षित ठेवलेली असते. अनेक वेळा या साधनांमध्ये चलनरहित व्यवहारांचे पुरावे, करसंबंधित महत्त्वाची कागदपत्रे, बँक व्यवहारांची नोंद आणि व्यावसायिक प्रकल्पांची माहितीही साठवलेली असते. त्यामुळे या उपकरणांचा केवळ भौतिक ताबा नव्हे, तर त्यातील माहितीचा योग्य वापर आणि संरक्षणही तितकेच आवश्यक ठरते. इच्छापत्रामध्ये या उपकरणांचा स्पष्ट उल्लेख करून त्यांचे हस्तांतरण कोणाला करायचे, त्यातील माहिती कोण जतन करेल किंवा कोणती माहिती नष्ट करायची याबाबत सविस्तर सूचना दिल्यास भविष्यातील गोंधळ टाळता येतो तसेच विश्वासू व्यक्तीकडे सुरक्षितरीत्या संकेतशब्दांची माहिती उपलब्ध करून दिल्यास वारसांना या साधनांचा उपयोग सुलभपणे करता येतो आणि मौल्यवान माहिती सुरक्षित राहते.
वशशरिज्ञऽवशशरिज्ञीहळज्ञर्रीिीी.लो
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
---