अर्जुनी मोरगाव,
tiger attack तालुक्यातील बोंडगाव/सुर परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ९ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाढत्या वाघाच्या वावरामुळे जंगल परिसराला लागून असलेल्या गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनिता चंद्रकुमार हटवार (४७) रा. बोंडगाव/सुरबन असे त्या जखमी महिलेचे नाव आहे.

सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने पहाटेपासूनच मोठ्या संख्येने महिला व नागरिक तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात जात आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास इतर महिलांसह सुनिता हटवार या नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी जवळील जंगल परिसरात गेल्या होत्या. यावेळी झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनिता यांच्यावर झडप घालत हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सुनिता यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी धाडस दाखवत घटनास्थळी धाव घेतली. महिलांचा गोंधळ आणि आरडाओरड ऐकून वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. tiger attack या हल्ल्यात सुनिता हटवार यांच्या हात, पाठ आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ जंगलातून बाहेर काढून अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बोंडगाव/सुरबन तसेच आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मागील काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करण्यात आली. tiger attack नागरिकांनी जंगलात एकट्याने न जाण्याचे तसेच समूहानेच जंगलात प्रवेश करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वाघाचा माग काढण्यासाठी गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, जखमी महिलेला वनविभागाकडून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, जंगल परिसरात सतत गस्त ठेवावी आणि तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.