निर्मल नगरीत साकारले भक्तीचे भव्य धाम

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nirmal Nagari उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या भव्य मंदिराच्या उभारणीत श्रद्धेय स्व. प्रभाकर राऊत यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक देवराव प्रधान यांनी व्यक्त केले. निर्मल नगरी येथील मंदिरात देवराव प्रधान व त्यांच्या पत्नींचा सत्कार सुनील बालपांडे यांनी केला. यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की, स्व. प्रभाकर राऊत यांच्या अथक परिश्रमांमुळे संत गजानन महाराजांचे सुंदर आणि आकर्षक मंदिर साकार झाले. त्यामुळे या परिसराला नागपूरचे 'शेगाव' अशी ओळख मिळाली आहे.
 
Nirmal Nagari
 
रघुजीनगर पोलीस क्वार्टर परिसरातील श्री संत गजानन महाराज मठात १९८३ ते २०१७ या कालावधीत सलग ३५ वर्षे श्रींचा प्रकटदिन उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर २०१८ पासून निर्मल नगरीतील नव्या भव्य मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. Nirmal Nagari मंदिर परिसरात संत गजानन महाराजांच्या मूर्तीसह विविध देवतांच्या आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच पारायण कक्ष, साधना कक्ष, ध्यान कक्ष आणि श्रींचे विश्रामस्थळ अशा विविध सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिर दररोज सकाळी ६ ते रात्री ९ ते १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते.
  
प्रत्येक गुरुवारी सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते, तर एकादशीला नियमित भजन कार्यक्रम होतात. मंदिराच्या माध्यमातून सद्गुरूंचे महत्त्व अधोरेखित करत ‘सद्गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. स्व. प्रभाकर राऊत यांच्या स्मरणार्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. Nirmal Nagari यामध्ये प्रकटदिन उत्सव, पुण्यतिथी, श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपूर-शेगाव व नागपूर-कोराडी दिंडी यात्रा, जळगाव जामोद-शेगाव पालखी यात्रा तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात येते. याशिवाय आरती, भजन आणि भक्ती सत्संग यांसारखे कार्यक्रम नियमितपणे पार पडतात.
 
मंदिराच्या धार्मिक व सामाजिक कार्यात ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक सातत्याने योगदान देत असून त्यांच्या सेवाभावामुळे निर्मल नगरीतील श्री संत गजानन महाराज मंदिर नागपूरच्या आध्यात्मिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास आले आहे. Nirmal Nagari यावेळी झालेल्या सत्कार समारंभाला सुनील दादा बालपांडे, सुरेश रोकडे, राजकुमार चोपकर, मोहनदादा वैरागडे आणि दीपक प्रभाकर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र