नागपूर,
Agnikarma Camp दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्या डॉ. हर्षला राजूरकर यांच्या नेतृत्वात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आयुर्वेदातील पारंपरिक अग्नीकर्म उपचारपद्धतीबाबत जनजागृती करण्यात आली. आधुनिक जीवनशैलीमुळे सांधेदुखी, कंबरदुखी, मांसपेशींच्या वेदना, ग्रीवेदुखी तसेच विविध जुनाट वेदनादायी विकारांचे प्रमाण वाढत आहे. अशा समस्यांवर आयुर्वेदातील प्रभावी उपचारपद्धती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्नीकर्म उपचारांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.

विश्वकुंभ आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदातील पारंपरिक शलाका पद्धतीद्वारे अग्नीकर्म उपचार यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. Agnikarma Camp अग्नीकर्म ही आयुर्वेदातील प्राचीन आणि प्रभावी चिकित्सा पद्धती असून, विशेष धातूपासून तयार केलेल्या शलाकेच्या साहाय्याने नियंत्रित उष्णतेचा वापर करून वेदनाग्रस्त भागावर उपचार केले जातात. या उपचारामुळे वेदना व सूज कमी होण्यास मदत होते, रक्तसंचार सुधारतो तसेच स्नायूंवरील ताण कमी होतो. सायटिका, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, गुडघेदुखी, टेनिस एल्बो, टाचदुखी आदी विकारांमध्ये अग्नीकर्म उपचार लाभदायक ठरत असल्याचे सांगितले जाते.
यावेळी बोलताना डॉ. पुसदकर यांनी सांगितले की, अग्नीकर्म ही शस्त्रक्रियेविना वेदना कमी करणारी सुरक्षित आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचारपद्धती आहे. Agnikarma Camp योग्य निदान आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केल्यास रुग्णांना दीर्घकालीन आराम मिळू शकतो. आधुनिक निदान पद्धती आणि पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांचा समन्वय साधत रुग्णांना अधिक प्रभावी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुर्वेदातील शास्त्रोक्त उपचारपद्धतींच्या माध्यमातून रुग्णांना नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र