गोरस भंडार कारवाई; जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध उत्पादकांची धडक

किमान दूध वितरणाला परवानगी द्या; शेतकर्‍यांचा आक्रोश

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
वर्धा,
farmers outcry गोरस भंडार येथे अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर आणि वर्धा येथील अधिकार्‍यांनी धाड टाकून अस्वच्छतेचे कारण पुढे करीत २५ लाख ८६ हजारांचे दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. पुढील आदेशापर्यंत दुग्धजन्य पदार्थाचे प्रोसेसिंग आणि विक्रीवरर बंदी घातल्याने शेतकर्‍यांचे दूध गोरस भंडार प्रशासनाने स्विकारणे बंद केले. त्यामुळे आता हजारो लिटर दुधाचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. आज सोमवार १ रोजी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत किमान दूध वितरणाला परवानगी द्या, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केली.
 
 
farmers outcry
 
रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गोरस भंडार येथे धाड टाकून कारवाई करीत अस्वच्छतेचे कारण पुढे करीत २५ लाख ८६ हजारांचे दूग्धजन्य पदार्थ जप्त केले. पुढील आदेशापर्यंत विक्री करण्यावर बंदी घातली आहे. या कारवाईमुळे १५ गावांतील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. या गावांतील नोंदणीकृत ६०० पेक्षाही अधिक दूध उत्पादक शेतकरी तीन पिढ्यांपासून गोरस भंडारला दूध विक्री करीत आहेत. या दूध विक्रीतूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अचानक झालेल्या कारवाईमुळे दूध उत्पादक संकटात सापडले आहे. रविवारपासून गोरस भंडार प्रशासनाने दूध स्विकारणे बंद केल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
 
 
दरम्यान, संतप्त शेतकर्‍यांनी सोमवारी धडक देत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. हेतूपुरस्पर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. दूग्धजन्य पदार्थ वगळता आम्हाला दूध विक‘ीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी रेटून धरली. तीन पिढ्यांपासून आम्ही गोरस भंडारला दूध पुरवित असून यातूनच आमच्या चुली पेटत आहे. मात्र, अचानक कारवाई झाल्याने आम्ही दूध विकायचे कुठे, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
 
 
दोन दिवसात प्रश्न निकाली काढू : जिल्हाधिकारी
दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तक्रार जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली. यावर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सध्या मदर डेअरी येथे दूध विक्री करा. अन्न व औषध प्रशासनाशी बैठक बोलावून यावर दोन दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिले. मात्र, गोरस भंडार आणि मदर डेअरी यांच्या दरामध्ये जवळपास ७ रुपयांचा फरक असल्याने मदर डेअरीवर दूध विक्री करणे आम्हाला परवडणारे नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. त्यामुळे दूध गोरस भंडार प्रशासनानेच घेऊन ते गावकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची संमतीवजा मागणी शेतकर्‍यांनी केली.
 
 
वर्धेकरांमध्ये नाराजी
रविवारी गोरस भंडारवर कारवाई केल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. दरम्यान, अतिशय विश्वासु असलेल्या या गोरस भंडारवर कारवाई केल्याने वर्धेकरांनी प्रचंड नाराजी व्यत केली. चुक असेल तर कारवाई करायला हरकत नाही. त्रुट्या असतील तर काही दिवसांची सवलत देण्यात यायला हवी होती. परंतु, ही कारवाई कोणी केलेल्या तक्रारीवरून तर करण्यात आली नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.