अमरावतीत महायुतीत फूट?

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
पाच उमेदवारांचे नामांकन दाखल
अमरावती विधान परिषद निवडणूक
 
अमरावती, 
Amravati Legislative Council विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवार नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले, यापूर्वी एकाने अर्ज दाखल केला असल्याने आता एकूण पाच जणांचे अर्ज आले आहे. त्यात भाजपा व काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एक अणि दोन अपक्षांचा समावेश आहे.
 
 
amt
 
भाजपातर्फे प्रवीण पोटे पाटील यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने हजर होते. याशिवाय महायुतीत असलेल्या शिवसेनेचे आ. बच्चू कडू, आनंदराव अडसुळ, राष्ट्रवादीचे आ. संजय खोडके, भाजपाचे आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, रविराज देशमुख, प्रभुदास भिलावेकर, सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. उत्साहाच्या वातावरणात प्रवीण पोटे यांचा अर्ज दाखल केला.
 
 
काँग्रेसतर्फे हर्षजीत देशमुख यांनी अर्ज दिला होता, आज त्यांनी पक्षाचा बी फॉर्म दिला. वंचित बहुजन आघाडीकडून चांदूर रेल्वे येथील नगरसेवक डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी अर्ज दाखल केला. प्रशांत श्रीधर महल्ले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दिला. याशिवाय परभणी - हिंगोली मतदारसंघाचे माजी आमदार विप्लव गोपिकिसन बाजोरीया यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे अंतिम क्षणी ते अर्ज दाखल करण्यासाठी आले. २ जूनला अर्जाची छाननी होईल.
 
 
प्रवीण पोटे विजयी होतील
अमरावतीत महायुती भक्कम असल्याने आमचे उमेदवार प्रवीण पोटे विक्रमी मतांनी विजयी होतील. राणा दाम्पत्य बाहेरगावी असल्याने ते अनुपस्थित होते. माझे रवि राणा यांच्याशी सकाळीच बोलणे झाले. दोघेही अमरावतीत आल्यावर माझ्याशी चर्चा करणार आहे. ते प्रवीण पोटे यांना मदत करतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.
 
 
महायुतीत फूट?
Amravati Legislative Council  परभणी - हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार विप्लव बाजोरीया यांना वेळेवर उमेदवारी नाकरण्यात आली. त्यांनी लगेच अमरावतीत शेवटच्या क्षणी धाव घेऊन अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्या मदतीला युवा स्वाभिमानचे काही पदाधिकारी होते. तसेच आज राणा दाम्पत्य देखील अनुपस्थित होते. त्यामुळे महायुतीत फूट तर पडणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाजोरीया यांनी नामांकन परत घेतले नाही तर फुटीवर शिक्कामोर्तब होईल. बाजोरीया मैदानात कायम राहीले तर निवडणूक रंगतदार होईल. त्यांनी नियोजनपूर्वक अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे.