शेतकर्‍याने स्वखर्चातून उभारला पूल

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
सर्व शेतकरी व मजुरांची झाली सोय
 
तिवसा, 
farmer built the bridge at his own expense शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या कामांना अनेकदा सामान्य नागरिकांना स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करावे लागते. तिवसा तालुक्यातील वरखेड येथे अशाच एका जिद्दी आणि समाजहिताची जाणीव असलेल्या शेतकर्‍याने स्वतःच्या खर्चातून पूल बांधून ग्रामीण भागासाठी आदर्श निर्माण केला आहे. वरखेड येथील प्रगतशील शेतकरी मोहन अग्रवाल यांनी तब्बल ७० ते ८० हजार रुपये खर्च करून नाल्यावर पूल उभारला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
pul
 
वरखेड येथील सर्वे क्रमांक ३२ मधील शेतांमध्ये जाण्यासाठी असलेल्या मार्गावर खोल नाला असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यावर शेतांमध्ये जाणे-येणे पूर्णपणे बंद होत असे. अनेक वेळा शेतकरी आणि मजुरांना शेतातच अडकून राहण्याची वेळ येत होती. विद्यार्थ्यांपासून ते महिला मजुरांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा फटका बसत होता.
 
 
armer built the bridge at his own expense  या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अग्रवाल यांनी परिसरातील शेतकर्‍यांच्या सह्या घेऊन आमदार आणि खासदारांच्या आढावा बैठकीत निवेदन सादर केले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अग्रवाल यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी परिसरातील शेतकर्‍यांना एकत्र येऊन पूल उभारण्याचे आवाहन केले. मात्र पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी स्वतःच खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून सुमारे ७० ते ८० हजार रुपये खर्च करून त्यांनी नाल्यावर मजबूत पूल उभारला. विशेष म्हणजे, केवळ आर्थिक मदतच नव्हे तर बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः उपस्थित राहून त्यांनी कामाची देखरेख केली. या पुलामुळे आता शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली वाहतुकीची समस्या दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.