कोलकाता,
BJP Cabinet Expansion in Bengal पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी भव्य वातावरणात पार पडला. राजभवनात (लोकभवन) झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवी यांनी ३५ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या गजरात झालेल्या या सोहळ्याने राजकीय वातावरण अधिकच भारावून गेले.या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची एकूण सदस्यसंख्या ४१ वर पोहोचली आहे. भाजपने या विस्तारात सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे. शपथ घेतलेल्या नव्या मंत्र्यांमध्ये विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करण्यात आले असून पक्षाने आपल्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.
१३ नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद
नव्या मंत्रिमंडळात १३ नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद, ३ जणांना स्वतंत्र कार्यभार आणि उर्वरित १९ जणांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून तापस रॉय, अर्जुन सिंह, स्वपन दासगुप्ता, शंकर घोष, दीपक बर्मन, मनोज ओराव यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शपथ घेतली. स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांमध्ये मालती राभा रॉय, राजेश महतो आणि इंद्रनील खान यांचा समावेश आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी
राज्यमंत्री म्हणूनही मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून या यादीत अशोक दिंडा, जुआल मुर्मू, संतनु प्रामाणिक, पूर्णिमा चक्रवर्ती, कौशिक चौधरी, भास्कर भट्टाचार्य, गार्गी दास घोष आणि इतर अनेक नावांचा समावेश आहे. एकूणच नव्या मंत्रिमंडळात तरुण नेतृत्व आणि अनुभवी चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.
पारंपरिक बंगाली पोशाखात दिसले मंत्री
शपथविधी सोहळ्यात अनेक मंत्री पारंपरिक बंगाली पोशाखात दिसले, ज्यामुळे स्थानिक संस्कृतीचा प्रभाव ठळकपणे जाणवला. भाजपने बंगालच्या संस्कृतीशी आपली जोड अधिक मजबूत असल्याचा संदेश या माध्यमातून दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.दरम्यान, शपथविधीनंतर सर्व नवनियुक्त मंत्री थेट नबन्ना सचिवालयात रवाना झाले असून मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण्याची तयारी केली आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भव्य विस्ताराला केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार, शांतनु ठाकूर, प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभली. या घडामोडीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.