ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
गुवाहाटी
Chandrakant Limaye, ‘चंद्रमोहिनी’, ‘जयध्वनी’ अशा रागांची निर्मिती करून आपल्या प्रतिभेने संगीतविश्व समृद्ध करणारे आणि मराठी संगीत रंगभूमीवर ‘कट्यार काळजात घुसली’ या सुप्रसिद्ध नाटकात गुरू पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर ‘खाँसाहेब आफताब हुसेन’ ही व्यक्तिरेखा साकारून ही भूमिका अक्षरशः जगलेले ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे रविवारी गुवाहाटी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पं. वसंतरावांची गायकी समर्थपणे पुढे नेणारा ‘आफताब’ (सूर्य) हरपल्याची भावना संगीतविश्वातून उमटली.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज, सोमवारी ठाण्यात आणण्यात येणार असून, ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दुपारी २.३०नंतर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
 

Chandrakant Limaye, 
पं. चंद्रकांत लिमये हे सपत्नीक आसामच्या सहलीवर गेले होते. रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सहा वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती काहीशी नाजूक असली, तरी त्यांनी अखेरपर्यंत संगीतसेवा अखंड सुरू ठेवली. प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते.
पं. लिमये यांच्या नसानसांत Chandrakant Limaye, त्यांचे गुरू डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी भिनलेली होती. वसंतराव देशपांडे यांच्या निधनानंतर ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकातील खाँसाहेबांची भूमिका त्यांनी समर्थपणे साकारली. शंभरहून अधिक प्रयोगांमधून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आणि त्या भूमिकेवर स्वतःचा ठसा उमटवला.
गायक म्हणून लौकिक मिळवतानाच ते गुरुभक्त शिष्य म्हणूनही ओळखले जात. वसंतराव देशपांडे यांच्या शेकडो मैफलींमध्ये त्यांनी तानपुरा साथ केली. देशभरातील दौऱ्यांमध्ये ते गुरूंसोबत असत. त्यांच्या गायकीतून वसंतरावांच्या परंपरेचा वारसा आणि नाट्यसंगीताची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचत राहिली.