नागपूर,
Mahavitarans Negligence सप्तगिरी नगर, नरेंद्र नगर परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर व स्विच पेटीच्या असुरक्षित स्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी असलेली स्विच पेटी अनेकदा उघडीच राहते, कारण त्याला कडी-कुलूप नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ट्रान्सफॉर्मर परिसराला संरक्षणासाठी गेटही नसल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. या परिसरात मोकाट जनावरे व भटकी कुत्री मुक्तपणे वावरत असल्याचे दिसून येते. परिसरात झाडे-झुडपे वाढले असून स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी ट्रान्सफॉर्मर परिसरात ठिणगी पडून कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच विझवण्यात आली, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. अशा घटनांमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना अंधारात राहावे लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. Mahavitarans Negligence महावितरणने संबंधित परिसराची तातडीने स्वच्छता करावी, ट्रान्सफॉर्मर परिसराला संरक्षक गेट बसवावे, तसेच उघडी असलेली स्विच पेटी सुरक्षित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य: उदय दिवे, संपर्क मित्र