कराचीतून भारताविरुद्ध कट?

अंडरवर्ल्डच्या नव्या जाळ्याचा पर्दाफाश

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Conspiracy against India from Karachi दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अलीकडेच केलेल्या कारवाईत देशविरोधी कटाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विविध राज्यांतून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्क भारतात पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या संपूर्ण मॉड्यूलच्या हालचालींचे सूत्रधार म्हणून मुन्ना झिंगर या अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तपासात असे आढळून आले की, मुन्ना झिंगर पाकिस्तानातील कराची शहरातून आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधत होता.
 

गुर्गा मुन्ना झिंगाड़ा 
सुरक्षित ठिकाणाहून तो व्हिडिओ कॉल आणि इतर डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने भारतातील नेटवर्कशी संवाद साधत असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागांमध्ये नव्या गुन्हेगारी जाळ्याची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या नेटवर्कमध्ये तरुणांची भरती, आर्थिक मदत आणि शस्त्रसाठ्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न केल्याचेही तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही आरोपींनी आर्थिक मदतीची मागणी केल्याचे आणि त्यानंतर सीमापारून शस्त्रे व स्फोटक साहित्य भारतात पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचे पुरावे तपासात समोर आले आहेत. पंजाबमधील काही भागांत शस्त्रसाठा टाकण्यात आल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून त्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, देशातील अंडरवर्ल्डच्या बदलत्या समीकरणांमुळे या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जुन्या गुन्हेगारी नेटवर्कची ताकद कमी होत असताना नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, काही जुन्या गुन्हेगारी संबंधांचा वापर करून भारतात पुन्हा प्रभाव निर्माण करण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र, वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करत हा कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असून देशातील विविध शहरांमध्ये छापेमारी मोहीम राबविण्यात येत आहे. तपास पुढे सरकत असताना या नेटवर्कशी संबंधित आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.