नागपूर
Legislative Council Bypoll विधानपरिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपाने प्रदेश कार्यकारिणी सदस्य व संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेले डॉ. राजीव पोतदार यांना रविवारी उशिरा उमेदवारी जाहीर केली, तर महाविकास आघाडीने आज 1 जून रोजी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांना उमेदवारी दिली.
Legislative Council Bypoll दोन्ही प्रमुख उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेचा कार्यकाळ 1 जानेवारी 2028 पर्यंतच शिल्लक आहे.
Legislative Council Bypollभाजपाने डॉ. राजीव पोतदार यांच्या माध्यमातून संघटनेशी नाळ जुळलेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या नेटवर्कशी सुसंगत असा चेहरा पुढे केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम होता. काँग्रेसमध्ये काही स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत असताना अखेरीस पक्षाने अतुल लोंढे यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. राज्यस्तरावर आक्रमक भूमिका मांडणारे आणि माध्यमांमध्ये सातत्याने पक्षाची बाजू मांडणारे नेते म्हणून लोंढे यांची ओळख आहे. महाविकास आघाडीसमोर मात्र संख्याबळाचे मोठे आव्हान आहे.
Legislative Council Bypoll काँग्रेसच्या डमी उमेदवाराचीही चर्चा
विशेष म्हणजे काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश ढोले यांनीही डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज छाननी किंवा अन्य तांत्रिक अडचणी उद्भवल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेत कोणताही धोका होऊ नये यासाठी खबरदारी घेतल्याचे दिसून येते. तुम्ही काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहात का असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता मला पक्षश्रेष्ठींनी अर्ज भरण्यास सांगितला असून त्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे ढोले यांनी टाळले.
Legislative Council Bypoll आकड्यांचे गणित निर्णायक
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांमध्ये महापालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी सहभागी असतात. विद्यमान राजकीय परिस्थितीत महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याचा दावा भाजपा नेते करीत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरमध्ये सुमारे 800 मतांपैकी जवळपास 600 मते महायुतीकडे असल्याचा दावा केला आहे.