सिरोंचा,
Narayanpur उन्हाळी धानाची कापणी होऊन तब्बल महिना उलटूनही शासनाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने नारायणपूर परिसरातील शेतकर्यांचा संताप अखेर सोमवारी रस्त्यावर उतरला. संतप्त शेतकर्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शेतकर्यांनी सांगितले की, उन्हाळी धानाचे उत्पादन घरात पडून आहे. खरेदी केंद्र सुरू नसल्याने धान साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली असून अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून हमीभावाने खरेदी होत नसल्यामुळे खासगी व्यापारी अत्यल्प दराने धान खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. Narayanpur या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी प्रतिनिधींनी 25 मे रोजी तहसीलदार यांना निवेदन सादर करून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त शेतकर्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनादरम्यान शेतकर्यांनी धानाच्या पोत्यांसह महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. काही काळ रस्त्यावर धान टाकून वाहतूक रोखण्यात आली. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. Narayanpur आपल्या व्यथा आणि संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात काही धान जाळून निषेध नोंदविला.
घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पणन विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. चर्चेनंतर पुढील तीन दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. Narayanpur प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकर्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.