नेपिडॉ,
In a massive explosion in Myanmar भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्येएक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. ईशान्य भागातील एका गावात झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान ५५ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हा स्फोट चीन सीमेजवळील नामखम टाउनशिपमधील काउंगटुप गावात झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील शेकडो घरे क्षणात उद्ध्वस्त झाली. अनेक घरे पूर्णपणे कोसळल्याने नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या इमारतीत हा स्फोट झाला तेथे खाणकामासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागे निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे हा भाग सध्या ता'आंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दुर्घटनेचे नेमके स्वरूप आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहेत. दरम्यान, दुर्घटनेनंतरचे दृश्य अत्यंत विदारक असल्याचे समोर आले आहे. ढिगाऱ्यांमध्ये बदललेली घरे, जखमी नागरिक आणि सुरू असलेले बचावकार्य पाहून संपूर्ण म्यानमार हादरला असून या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.